मा. ना. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
फलटण टुडे (मुंबई )ः –
मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात सर्वत्र एक वेगळाच वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
आज छ. शिवाजी महाराज क्रीडांगण, दादर येथे लंगडीच्या स्पर्धेचे उद्घाटन मा. ना. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, रश्मी तेंडूलकर व मुंबईतील लंगडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेत १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व खुल्या गटाच्या स्पर्धा झाल्या या स्पर्धांमध्ये सर्वच गटात भरपूर नोंदणी झाल्याने शिवाजी पार्क मैदानावर खेळाडूंची एकाच गर्दी झाली होती.
आज झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वैभव स्पो. क्लबचा २७-१४ असा १३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्री गणेशच्या गौरव काप व प्रणय झोरे यांनी संरक्षण व आक्रमणात जोरदार कामगिरीची नोंद करत विजयाला गवसणी घातली तर पराभूत वैभव स्पो. क्लबच्या खेळाडूंना विशेष प्रभाव पडता आला नाही.
१७ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वैभव स्पो. क्लबचा १५-११ असा एक डाव ४ गुणांनी पराभव करत विजय मिळवला. या सामन्यात श्री गणेशच्या जान्हवी वाघ व कोमल फकिरे यांनी वैभवाच्या खेळाडूंना या सामन्यात जराही डोके वर काढण्याची संधी दिली नाही व हा सामना डावाने जिंकला.
पुरुष गटात श्री गणेश विद्यालयाने अमरहिंद मंडळावर १९-१८ असा अतिशय चुरशीच्या सामन्यात एक गुणाने विजय मिळवला. या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या आदर्श शिंदे व मनीष चव्हाण यांनी विजय अक्षरश: खेचून आणला तर अमरहिंदच्या गौरव कुडाव व गणेश साहू यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून कुनील सोनावणे यांनी महापालिकेतर्फे तर योगेश जोशी व संजीव देशपांडे यांनी क्रीडा भारती तर्फे तर बाळ तोरसकर व अरुण देशमुख यांनी संघटने तर्फे कामकाज पहिले.