फलटण टुडे (फलटण, दि. २९ ) : –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिनी प्रशालेतील उत्तम काम करणारे २ शिक्षक व एक कर्मचारी यांना आदर्श शिक्षक व आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून खंडित झालेली पुरस्काराची ही परंपरा यावर्षी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यांनी सांगितले.
सन २०२३ – २०२४ सालच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने अमोल नाळे व सौ. विजयमाला सुभाष माने या शिक्षकांना आणि चंद्रकांत निंबाळकर या कर्मचाऱ्यास सन्मानित करण्यात आले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष अशोक दोशी व सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षक व कर्मचारी यांचा पुरस्कार देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, वरद आर्ट्सचे महेश उर्फ गोटू सुतार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुधोजी हायस्कूल येथील शिक्षक अमोल नाळे यांचे काम कौतुकास्पद असून आदर्श शिक्षक पुरस्काराला साजेसे काम त्यांनी केले आहे. आगामी काळातही त्यांचे काम नक्कीच गौरवास्पद असेल असे मत व्यक्त करीत श्रीमंत संजीवराजे यांनी अमोल नाळे व अन्य दोन्ही पुरस्कारार्थी शिक्षक व कर्मचारी यांचेही अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
.