माहीम वॉरियर्स, परेल रुद्रास व वरळी फिनिशर्सची विजयी सलामी
ड्रीम रन्सच्या जोरावर माहीम वॉरियर्सचा लालबाग स्पार्टन्सवर विजय
वरळी फिनिशर्सचा माटुंगा फायटर्सवर मोठा विजय
परेल रुद्रासने उडवला दादर पँथर्सचा धुव्वा
आयुष गुरव, वेदांत देसाई, पियुष घोलम यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
फलटण टुडे मुंबई २८ जाने. (क्री. प्र,) : –
दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेत आज ड्रीम रन्सच्या जोरावर अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात माहीम वॉरियर्सने लालबाग स्पार्टन्सवर २ गुणांनी विजय मिळवला. व वरळी फिनिशर्सने माटुंगा फायटर्सवर ७ गुणांनी मोठा विजय मिळवला तर परेल रुद्रासने दादर पँथर्सचा १२ गुणांनी धुव्वा उडवत आज विजयी सलामी दिली. या सामन्यांमध्ये अनुक्रमे आयुष गुरव (माहीम वॉरियर्स), वेदांत देसाई (वरळी फिनिशर्सने) व पियुष घोलम (परेल रुद्रास) यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज सर्वात चुरशीचा ठरलेला सामना रंगला तो माहीम वॉरियर्सने व लालबाग स्पार्टन्स यांच्यात, या सामन्यात चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये माहीम वॉरियर्स १२-१६ असे ४ गुणांनी पिछाडीवर होता व लालबाग स्पार्टन्स विजयाच्या उंभरट्यावर उभा होता. मात्र त्यावेळी माहीम वॉरियर्सच्या आयुष गुरवने (१.०५, ३.१० मि. संरक्षण व १ गुण) कर्णधाराची खेळी करत व ड्रीम रन्स मिळवून देत विजय सोपा केला. त्याच्या तुकडीने एकूण ४ ड्रीम रन्स मिळवून देत विजयाला गवसणी घातली व हा सामना ड्रीम रन्स मुळेच जिकला गेला. या सामन्यात माहीम वॉरियर्सच्या रोहन टेमकर (२.१० मि. संरक्षण), जनार्दन सावंत (१.३५ मि. संरक्षण व २ गुण), अनंत चव्हाण (१.३० मि. संरक्षण व १ गुण) तर सिद्विक भगत, सिद्धेश चोरगे व ओमकार मिरगळ (प्रत्येकी २-२ गुण) यांनी विजयात जोरदार कामगिरी केली तर लालबाग स्पार्टन्सच्या श्रेयस राऊळ (२.१५ मि. संरक्षण व २ गुण), पियुष काडगे (२.२० मि. संरक्षण व १ गुण), श्रीकांत वाल्लाकाठी (१.२० संरक्षण व ३ गुण), हर्ष कामतेकर (१.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली.
वरळी फिनिशर्सने माटुंगा फायटर्सवर २१-१४ असा ७ गुणांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना समान संधी होती मात्र मध्यंतरानंतर वरळी फिनिशर्सने जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवला. या सामन्यात वरळी फिनिशर्सच्या वेदांत देसाई (३ मि. संरक्षण व ६ गुण) चौफेर कामगिरी करत सामना एकहाती मोठ्या विजयाकडे नेला. त्यांच्याच शुभम शिंदे (२.२० मि. संरक्षण), सनी तांबे (१.४० मि. संरक्षण व ३ गुण), विशाल खाके (१.५० मि. संरक्षण) यांनी केलेल्या तगड्या खेळीने वरळी फिनिशर्सने मोठा विजय साजरा केला. तर माटुंगा फायटर्सच्या प्रसाद राडीये (१.३०, २.३० मि. संरक्षण), शुभम कांबळे (२ मि. संरक्षण व २ गुण), गणेश साहू (१.५० मि. संरक्षण) व प्रशिक मोरे (१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांची लढत अपुरी ठरली. या सामन्यात वरळी फिनिशर्सने ९ तर माटुंगा फायटर्सने ६ ड्रीम रन्स मिळवले.
आणखी एका सामन्यात परेल रुद्रासने दादर पँथर्सचा २५-१३ असा १२ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात सुरवातीपासूनच परेल रुद्रासने जोरदार खेळाचे प्रदर्शन करत दादर पँथर्सला जराही डोके वर काढण्याची संधी दिली नाही. या सामन्यात परेल रुद्रासच्या पियुष घोलमने (१.४० मि. संरक्षण व ६ गुण), हितेश आग्रे (२ मि. संरक्षण व १ गुण), सुरज खाके (१.४०, १ मि. संरक्षण व ३ गुण), आशुतोष शिंदे (१.३०, १.१० मि. संरक्षण) यांनी केलेला बहारदार खेळ परेल रुद्रासच्या विजयात निर्णायक ठरला. तर दादर पँथर्सच्या पार्टिक घाणेकर (१.२०, २.१० मि. संरक्षण), प्रतिक होडावडेकर व किरण कर्णावर (प्रत्येकी ३-३ गुण) यांनी केलेली खेळी परेल रुद्रासचा रूद्रावतार रोखू शकली नाही व त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात परेल रुद्रासने ७ तर दादर पँथर्सने २ ड्रीम रन्स मिळवले.