*रोमांचक सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्सची बरोबरी*

*

*रामजी कश्यप व रोहन शिंगाडेच्या खेळीने सामना बरोबरीत*

*मुंबई खिलाडीस व गुजरात जायंट्सचा सामना सुध्दा बरोबरीत*
रोहन शिंगाडे व गजानन शेंगाळला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
फलटण टुडे वृत्तसेवाभुवनेश्वर, दि.२ जाने.: – 
आज झालेल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्स हा सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेला मुंबई खिलाडीस व गुजरात जायंट्सचा सामना सुध्दा बरोबरीत सुटला. हे सामने अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाले. आजच्या सामन्यामध्ये रोहन शिंगाडे व गजानन शेंगाळला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

आज झालेल्या सतराव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्सचा सामना ३०-३० (मध्यंतर १५-१३) असा बरोबरीत राहिला. चेन्नई क्विक गन्सला मध्यंतराला मिळालेल्या २ गुणांची आघाडी उपयोगी ठरली नाही. ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेतले व चेन्नई क्विक गन्सला संरक्षणासाठी आमंत्रित केले. पहिल्या टर्नमध्ये चेन्नई क्विक गन्सच्या पहिल्या तुकडीने संरक्षण करताना ३.३४ मि.ची वेळ दिली. या तुकडीतील आदर्श मोहितेला आकाशीय सूर मारत मनोज पाटीलने बाद केले, सुमन बर्मन (१.०७ मि. संरक्षण) व लक्ष्मण गवसने १.२५ मि. संरक्षण करताना २ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले त्याला महेशा पी.ने सहज स्पर्शाने बाद केले. तर दुसऱ्या तुकडीतील विजय शिंदे व मदनाला दिलीप खान्दाविणे बाद केल मात्र रामजी कश्यप शेवटपर्यंत नाबाद राहत ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला. या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सने १० तर चेन्नई क्विक गन्सने ३ असे गुण नोंदवले.   

दुसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडी २.०६ मिनिटात बाद झाली. दिलीप खांडवीला आकाशीय सूर मारत सचिन भार्गवने बाद केले. तर रामजी कश्यपने आकाशीय सूर मारत गौतम एम के ला घराचा रस्ता दाखवला. नंतर विशालला सुरज लांडेने आकाशीय सूर मारत बाद केल. दुसऱ्या तुकडीतील ओंकार सोनवणेला पुन्हा एकदा सुरज लांडेने आकाशीय सूर मारत बाद केल. त्यच्या पाठोपाठ दिपेश मोरेला (१.११ मि. संरक्षण) लक्ष्मण गवसने असाज स्पर्शाने बाद केले तर बी निखीलने (१.१५ मि. संरक्षण) ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले, त्याला आदित्य कुदळेने सहज स्पर्शाने बाद केले.
  
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी जवळजवळ २.२० मि. बाद झाली त्यात सचिन भार्गव व सुरज लांडे लवकर बाद झाले त्यांना अनुक्रमे आकाश मंडल व पी. महेशाने बाद केल. त्यानंतर आदित्य कुदळेला आकाशीय सूर मारत मनोज पाटीलने डीआरएस घेत बाद केले. दुसरी तुकडी साडेतीन मिनिटात दोन्ही तुकड्या बाद झाल्या त्यानंतर आलेल्या मदनाला रोहन शिंगाडेने लगेचच बाद केले. विजय शिंदेला बी. निखिलने बाद केल. त्यानंतर रामजी कश्यपने अतिशय उत्कृष्ट संरक्षणाची खेळी करत एक ड्रीम रन्स मिळवत चेन्नई क्विक गन्सला १६ गुणांवर आणून ठेवले. त्यात एकदा डीआरएस घेत रामजीने स्वत:ला नाबाद असल्याचे दाखवत शेवटपर्यंत नाबादच राहिला.   

शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडी मैदानात उतरल्यावर दीपक साहुला विजय शिंदेने एक मिनिटात बाद केले व अडीच मिनिटात पहिली तुकडी बाद करत चेन्नई क्विक गन्सने विजयाकडे घोडदौड सुरु केली. या तुकडीतील अक्षय मासाळ व मनोज पाटील लवकर बाद झाले. त्यांना अनुक्राने आकाश कदम व सुरज लांडेने अनुक्रमे स्तंभात व आकाशीय सूर मारत बाद केले. त्यानंतर पी. महेशाला आदर्श मोहितेने बाद केले तर अविनाश देसाईला दुर्वेश संळूखेने स्तंभात बाद केले तर रोहन शिंगाडेने एक ड्रीम रन मिळवून देत सचिन भार्गव कडून बाद झाला व हाच गुण त्यांना पराभवापासून वाचवण्यास कारणीभूत ठरला. तर शेवटच्या क्षणाला रामजी कश्यपने विशालला बाद करून हरणाऱ्या सामना बरोबरीत सोडवली. या सामन्यात पी. महेशा उत्कृष्ट आक्रमक, रामजी कश्यपला उत्कृष्ट संरक्षक तर रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.      
  
आज झालेल्या दुसऱ्या व अठराव्या सामन्यात सुध्दा मुंबई खिलाडीस व गुजरात जायंट्सचा सामना २६-२६ (मध्यंतर १३-१३) असा बरोबरीत राहिला. मुंबई खिलाडीसने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. या सामन्यातील पहिल्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसच्या संरक्षकांनी ३,२४ मि. संरक्षण करत एक ड्रीम रन्स मिळवत गुजरात जायंट्स विरुध्द एक चांगली खेळी केली. मुंबईच्या प्रतिक देवारेने चांगली खेळी करत १ ड्रीम रन्स मिळवून दिला मात्र त्याला भरत कुमारने बाद केले. दुसऱ्या तुकडीने सुध्दा दमदार संरक्षण करत दोन ड्रीम रन्स चे गुण मिळवून दिले ते श्रीजेश एसने. या टर्न मध्ये गुजरात जायंट्सने १० गुण मिळवले तर मुंबई खिलाडीसने ३ गुण मिळवले.    

दुसऱ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सने सुयश गरगटेने उत्कृष्ट खेळी केली तर शुभम थोरातने दोन ड्रीम रन्स मिळवून दिले व हे दोन्ही खेळाडू श्रीजेश एसने बाद केले. त्यानंतर दीपक माधवला रोकेसन सिंगने आकाशीय सूर मारत बाद केल मात्र त्यापूर्वी त्याने एक ड्रीम रन मिळवून दिला. त्यानंतर निलेश जाधव व संकेत जाधव लवकर बाद झाले व सामना मध्यंतराला १३-१३ असा बरोबरीत राहिला.     
              
तिसऱ्या टर्न मध्ये मध्ये मुंबई खिलाडीसच्या पहिल्या तुकडीने पॉवर प्ले मध्ये सुरवात केली. संपूर्ण खेळीत सात पैकी दोन खेळाडू वजीर म्हणून मैदानावर असतात व वजीर खो मिळाल्यावर पुढील खो देईपर्यंत तो कसाही संरक्षण करू शकतो. या तुकडीतील सुभाष संत्राला व्ही सुब्रमणिने बाद केले, सुरज भावेने एक ड्रीम रन मिळवला व त्याला पबनी साबरने बाद केले तर अनिकेत पोटेने (१.०५ मि. संक्षण) एक ड्रीम रन मिळवला व पहिली तुकडी ३.२० मिनिटा नंतर बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील अभिषेक पाथरोडेने पी. नरसय्या कडून बाद झाला मात्र त्याने त्याचे पूर्ण योगदान दिले. तर अविक सिंघाने एक ड्रीम रन मिळवला व संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. 

शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सने २३-१६ च्या आघाडीने संरक्षण करायला सुरवात केली व पहिल्या तुकडीने दोन ड्रीम रन्स मिळवले. त्यांच्या अभिजित पाटील व पबनी साबरला एस श्रीजेशने बाद करत मुबैला दिलासा मिळवून दिला. मात्र फैजंखा पठाणने दोन ड्रीम रन्स मिळवून दिले त्याला पी. शिवा रेड्डीने बाद केले. व्ही सुब्रमणिला पी. शिवा रेड्डीने स्तंभात बाद केले तर राजवर्धन पाटीलला गजानन शेंगाळने आकाशीय सूर मारत बाद केले मात्र त्यानंतर मुंबईला सामना जिंकता आला नाही व हा सामना २६-२६ असा बरोबरीत राहिला व दोन्ही संघांना २-२ गुण मिळवले. या सामन्यात एस श्रीजेशला उत्कृष्ट आक्रमक, पबनी साबरला उत्कृष्ट संरक्षक तर गजानन शेंगाळला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  
                
बुधवारी पहिला सामना मुंबई खिलाडीस व तेलुगू योद्धास यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान वॉरियर्स व ओडिशा जगरनॉट्स यांच्यात रंगेल. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी अल्टीमेट खो खो स्पर्धा सुरु केली असून हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!