फलटण टुडे (सातारा दि.२ ):-
थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्सव महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा 193 वा जयंती सोहळा बुधवार दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या विद्यमाने नायगाव खंडाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच सदर कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,
उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री, सातारा व ठाणे जिल्हा शंभूराज देसाई,
गृहनिर्माण, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे,
राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार, पदाधिकारी हे सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करुन मुख्यमंत्री महोदय शिल्पसृष्टीला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्याहस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शिल्पसृष्टी नुतनीकरण कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री हे महाज्योती यांचेकडील महिलांसाठीच्या विविध योजनांबाबतच्या माहिती प्रदर्शनास तसेच इतर मागासवर्ग महामंडळ व विमुक्त जाती महामंडळ यांचेकडील योजनांच्या माहिती प्रदर्शनास व महिला बचत गट प्रदर्शनास भेट देऊन पाहणी करणार आहेत. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. महाज्योती मार्फत उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्याहस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने बचत गटातील महिला, शालेय महाविदयालयीन युवती, व नागरिक उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.