*ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव कालावधीत वाहतूक बदलाचे आदेश जारी*

 

फलटण टुडे(सातारा दि.29 ): –
ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव गोंदवले बु. येथे 6 जानेवारी 2024 रोजी होणार असून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या दिवशी रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत सातारा ते पंढरपूर रस्त्यावर पिंगळी बु. गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते गोंदवले बु. गावातील आप्पा महाराज चौकापर्यंत वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

 

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस.टी. बसने येतात. याअंतर्गत 6 जानेवारी रोजी पहाटे पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक बदल करण्यात आला आहे.

 

सातारा ते पंढरपूर रस्त्यावर या कालावधीत सातारा वरून पंढरपूर अकलूज कडे जाण्यासाठी पिंगळी बु. गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते दहिवडी मार्गे राणंद, मार्डीवरून म्हसवड मार्गे जाणारा पंढरपूर रस्ता, पंढरपुर बाजूकडून साताराकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणी मार्गे सातारा अथवा म्हसवड ते शिंगणापूर फलटण मार्गे सातारा असा पर्यायी मार्ग राहील.

 

या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येईल. पर्यायी मार्गाचा वापर करुन पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!