गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्स सह तेलुगु योद्धास विजयी
राजस्थान वॉरियर्स, मुंबई खिलाडीसचा पराभव
फलटण टुडे (भुवनेश्वर, 24 डिसेंबर ): –
अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनला आज कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर शानदार सुरवात झाली. प्रेक्षकांच्या जोरदार जल्लोषाने या आवृत्तीला सुरवात झाली. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो पहिल्या सीझनमध्ये जबरदस्त हिट ठरली होती जी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने बिगर क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली. अल्टीमेट खो-खो हि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला यूके स्थित बीएनपी ग्रुपने निधीची उपलब्धता करून दिली आहे. अल्टीमेट खो-खो चे सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. तेनसिंग नियोगी, सीईओ आणि लीग कमिशनर, अल्टीमेट खो खो, सुधांशू मित्तल, अध्यक्ष, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया, तुषारकांती बेहरा, माननीय क्रीडा मंत्री, ओडिशा यांच्या उपस्थितीत अल्टीमेट खो खोच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या सत्राचे उद्घाटन झाले. भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार नसरीन शेख सुध्दा यावेळी उपस्थित होती.
श्रीनाथ चित्तूरी (चेन्नई क्विक गन्स), विनय सिंग (गुजरात जायंट्स), पुनित बालन (मुंबई खिलाडी), रणजित परिदा (ओडिशा जुगरनॉट्स), जिगर शाह (राजस्थान वॉरियर्स) आणि पीकेएसव्ही सागर (तेलुगु योद्धा) या सहा फ्रँचायझींचे मालक आणि प्रतिनिधी. धमाकेदार उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थित होते.
आज उद्घाटनीय सामन्यात यजमान व गतविजेता ओडिशा जगरनॉट्सने राजस्थान वॉरियर्सवर ३५-२७ असा ८ गुणांनी शानदार विजय संपादन केला. आज झालेल्या सामन्यात राजस्थान वॉरियर्सचा कर्णधार मजहर जमादारने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले. मात्र त्यंना त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान आले. मध्यंतरला ओडिशा जगरनॉट्सने राजस्थान वॉरियर्सवर (दोन ड्रीम पॉइंट्स सह) १६-१० अशी ६ गुणांची आघाडी घेतली व आपले मनसुबे सुरवातीपासूनच दाखवून दिले. दुसऱ्या डावात ओडिशा जगरनॉट्सने १९ गुणांची कमाईv केली. त्यावेळी प्रतीआक्रमाणात राजस्थान वॉरियर्सने १७ गुण (२ स्कायडायव्हद्वारे ४ गुणांसह) मिळवत जोरदार पलटवार करण्याचा प्रयत्न मात्र फसला व त्यांना ८ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.
दुसरा सामना मुंबई खिलाडीस विरुद्ध तेलुगु योद्धास यांच्यात झाला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अतिशय अटीतटीचे क्षण अनुभवयाला मिळाले. या सामन्यात तेलुगु योद्धासने मुंबई खिलाडीवर ४६-४४ असा दोन गुणांनी विजय मिळवत आपले विजयाचे खाते उघडले. मध्यंतराला मुंबई खिलाडीसने तेलगू योद्धासवर २६-२४ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती मात्र या आघाडीचा फायदा मुंबई खिलाडीसला करून घेता आला नाही. या सामन्यात तेलगू युद्धाच्या प्रतीक वाईकरने व राहुल मंडलने उत्कृष्ट खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर पराभूत मुंबईच्या अनिकेत पोटे व ऋषिकेशने जोरदार लढत दिली मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.
सोमवारी राजस्थान वॉरियर्सचा सामना गुजरात जायंट्सविरुद्ध होईल, तर चेन्नई क्विक गन्सचा सामना तेलुगू योद्धाविरुद्ध होईल.