कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार

गतविजेता ओडिशा जगरनॉट्स व राजस्थान वॉरियर्स सलामीला भिडणार 

रविवारी भारताच्या अल्टीमेट खो-खो कार्निव्हलला                                   सुरुवात 
फलटण टुडे वृत्तसेवा (भुवनेश्वर, 23 डिसें ).: –
भारतीय खेळांच्या प्रीमियर मध्ये तिसऱ्या स्थानावर (टेलिव्हिजन प्रेक्षक संख्येद्वारे) असलेल्या अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथे रंगणार आहे. हा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर, ओडिशा जगरनॉट्स विरूध्द राजस्थान वॉरियर्स यांच्यातील उद्घाटनीय सामन्यापासून रंगणार आहे. हे सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव ॲपवर थेट पहाता येणार आहेत.

अमित बर्मन यांच्या संकल्पनेतून खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने, अल्टीमेट खो-खो स्पर्धा सुरु झाली. यामुळे प्रेक्षकांसह कॉर्पोरेट संस्थांमध्येही प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. या खेळातील नाविन्यपूर्ण बदल खो-खो ला जागतिकस्तरावर नेण्यात महत्वाची भुमिका बजावणार आहे. अल्टीमेट खो-खो भारतातील तिसर्‍या स्थानावर असल्याचे टेलिव्हिजन प्रेक्षक संख्येद्वारे निश्चित झाले आहे. बीएनपी ग्रुपने या स्पर्धेसाठी निधीची उपलब्धता करून दिली आहे. दुसऱ्या आवृत्तीत प्रमुख भारतीय कॉर्पोरेट संस्था आणि क्रीडा गुंतवणूकदारांच्या मालकीखाली सहा संघ मैदानात उतरणार आहेत.

हे संघ 24 डिसेंबर 2023 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. भुवनेश्वरमध्ये शनिवारी आगामी हंगामाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना संबोधित करताना अल्टीमेट खो-खोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त तेनसिंग नियोगी यांनी माहिती दिली. “पहिल्या अल्टीमेट खो-खोच्या सत्रात मिळालेले यश अतुलनीय होते हेच यश स्वदेशी खेळांचा पाया भारतात भक्कम असल्याचे दाखवून देतो. अल्टीमेट खो-खो मध्ये कॉर्पोरेट जगत व खो खो चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता जो या खेळाला मोठी प्रेरणा देऊन गेला. २०२५ मध्ये अजून दोन संघ समाविष्ट केले जातील त्यामुळे अल्टीमेट खो खोचा विस्तार होईल अशी योजना आम्ही आखली आहे. देशभरातील व जगभरातील चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रेम लक्षात घेता, मला विश्वास आहे की सीझन दोन गेल्या मोसमातील यशाला मागे टाकेल. सीझन दोन मोठा आणि अधिक थरारक व रोमांचक होईल. मी सर्व संघांना शुभेच्छा देतो.”

यजमान ओडिशाने गेल्या दशकभरात वेगवेगळ्या खेळांत प्रमुख स्थान पटकावले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच ओडिशा हा सध्या क्रीडा क्षेत्राचा सर्वात मोठा बालेकिल्ला आहे. या राज्याने अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचे यजमानपद भूषवले आहे. कटक अल्टीमेट खो-खोच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतातील स्वदेशी खेळाच्या प्रगती आणि संवर्धनासाठी ओडिशाने चांगला प्रयत्न केला आहे. या अल्टीमेट खो-खो मुळे कटक आणि देशभरातील लोकांना उच्च व गुणवत्तापुर्ण खेऴाचे दर्शन होईल व त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.

या प्रसंगी सहा संघांच्या कर्णधारांनी पत्रकार परिषदेत आपल्या तयारीची माहिती दिली. मुंबई खिलाडीचा कर्णधार अनिकेत पोटे म्हणाला, “आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम सांगड घातलेला संघ आहे. हंगामापूर्वी आमचे प्रशिक्षक विकास सूर्यवंशी आणि नितुल दास यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. सर्व संघामध्ये उत्तम समन्वय असून 16 ते 18 वयोगटातील 33 होतकरू युवकांसह एकूण 145 खेळाडू, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. येत्या 21 दिवसांत ही स्पर्धा पार पडणार आहे.”

अल्टीमेट खो-खोच्या पहिल्या आवृतीला उद्घाटनाला 16 कोटी 40 लाख प्रेक्षक लाभले होते. त्यात टेलिव्हिजन व OTT प्लॅटफॉर्मवर 6 कोटी 40 लाख जागतिक प्रेक्षक लाभले होते. या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात 18 दिवसांच्या कालावधीत 30 साखळी सामने खेळले जातील. त्यामध्ये प्रत्येक संघ त्याच्या विरुध्द संघाबरोबर दोनदा भिडतील. या प्राथमिक टप्प्यातून पुढे येणारे अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि अंतिम सामना 13 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

मुंबई खिलाडी संघ: गजानन शेंगाळ, श्रीजेश एस, महेश शिंदे, अनिकेत पोटे, सुभाष संत्रा, हृषिकेश मुर्चावडे, रोकेसन सिंग, पी. शिव रेड्डी, गोविंद यादव, अविक सिंघा, मिलिंद कुरपे, सुनील पात्रा, सुधीर कुमार, एमडी सागर पाशा, सागर पोतदार, रोहन कोरे, कोमल, सचिन पवार, धीरज भावे, देबासिस, शिवा, अजय कश्यप, प्रीतम चौगुले, शिबिन एम, अभिषेक पाथरोडे आणि परमार राहुल.

सहभागी संघ व त्यांचे मालक
ओडिशा जुगरनॉट्स (ओडिशा सरकार), राजस्थान वॉरियर्स (कॅपरी ग्लोबल ग्रुप), चेन्नई क्विक गन्स (केएलओ स्पोर्ट्स), गुजरात जायंट्स (अदानी स्पोर्ट्सलाइन), मुंबई खिलाडी (पुनित बालन ग्रुप), तेलुगू योद्धा (जीएमआर स्पोर्ट्स)

अल्टीमेट खो-खो Sony Sports Network चॅनेल आणि Sony Liv अॅपवर थेट पहा

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!