फलटण टुडे (सातारा, दि.२२ ): –
जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींनी केंद्र, राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीसह स्वनिधीचे योग्य नियोजन करुन लोकहिताची नाविन्यपूर्ण कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, नगर परिषद प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सर्व नगर परिषदांनी व नगरपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रमांवर विशेष भर द्यावा. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी बांधकाम कामासाठी, उद्यानांसाठी वापरणे बंधनकारक करावे. स्मार्ट शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य ही योजना नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये प्रभावीपणे राबवावी.
महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेथील बसस्थानक नव्याने बांधून वरील दोन मजल्यावर वाहनतळ व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे ६० ते ७० टक्के वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल. या प्रकल्पाला टप्प्या टप्प्याने निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
यापुढे प्रत्येक दोन महिन्यातून एकदा नगर परिषद व नगरपंचायत निहाय कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.