४९ वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा अंतिम फेरीत धाराशिवकडून नाशिकच्या मुलींचा धुव्वा

कुमारांमध्ये पुण्याला नमवत प्रथमच सोलापूरला अजिंक्यपद

सोलापूरचा गणेश बोरकर व धाराशिव अश्विनी शिंदे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
फलटण टुडे (नंदूरबार,क्रि. प्र.), २२ डिसें. –
: महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि नंदूरबार खो-खो असोसिएशन आयोजित राज्यअजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत मुली गटात धाराशिवने नाशिकचा तर कुमार गटात सोलापूरने पुण्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सोलापूरने प्रथमच अजिंक्यपदावर मोहर उमटवली आहे.

नंदूरबार येथे झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने नाशिकचा ७-४ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून धाराशिवने संरक्षण स्विकारले. त्याला साजेसा खेळ करत धाराशिवची राष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदेने ६.१० मि. संरक्षणाची खेळी करत नाशिकच्या आक्रमणाची हवाच काढून टाकली. तिला मैथिली पवारने (१.३० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (नाबाद १ मि. संरक्षण) दमदार खेळी करत चांगली साथ दिली. यामुळे नाशिकला अवघे २ गुणच मिळवता आले. आक्रमणात धाराशिवने ७ गुण मिळवत नाशिकला मोठे आव्हान दिले. मात्र दुसऱ्या डावातील आक्रमणातही नाशिक चांगला खेळ करु शकला नाही. या वेळी संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या अश्विनी शिंदेने पुन्हा चमकदार खेळ करत ४.५० मिं. संरक्षण करत नाशिकला मोठी टक्कर दिली. मैथिली पवारने २.३० मिनिटे संरक्षण करत मोठ्या विजयाची संधी मिळवून दिली. यावेळीही नाशिकला २ खेळाडूच बाद करता आल्यामुळे धाराशिवने हा सामना ७-४ असा एक डाव ३ गुणांनी सहज जिंकत राज्य अजिंक्यपद पटकावले. नाशिकतर्फे सरिता दिवा (२.१० मिं. संरक्षण व १ गुण), ऋतुजा सहारे (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना मोठ्या पराभवापासून वाचवता आले नाही.  

कुमार गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. जादा डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात सोलापूरने पुण्याचा २४-२३ असा १ गुणाने निसटता विजय मिळवत अजिंक्यपदावर मोहर उमटवली. सोलापूरतर्फे गणेश बोरकर (२.१०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), कृष्णा बनसोडे (१.३०, १.१०, १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रतिक शिंदे (१.२०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दमदार खेळ करत सोलापूरला कुमार गटात पहिले-वहिले अजिंक्यपद मिळवून दिले. पराभूत पुण्याच्या चेतन बिका (२, २.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), भावेश मेश्रे (१.२०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दिलेली कडवी लढत अपुरी ठरली.

स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू : गणेश बोरकर (सोलापूर) , अश्विनी शिंदे (धाराशिव)

सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू: चेतन बिका (पुणे), सानिका चाफे (सांगली),

सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू फराज शेख (सोलापूर) , सुहानी धोत्रे (धाराशिव)
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!