अंजली चिपलकट्टी यांना यंदाचा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेकजागर पुरस्कार’ जाहीर

                   प्राचार्य शिवाजीराव भोसले

फलटण टुडे ( फलटण, दि.18 ): –
9 सर्कल, साखरवाडी येथील तत्त्वबोध विचार मंचच्या वतीने देण्यात येणारा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेकजागर पुरस्कार 2023’ अभ्यासू लेखिका अंजली चिपलकट्टी यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे ह्या पुरस्काराचे स्वरूप असून दि 28 ते 30 डिसेंबर रोजी 9 सर्कल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक व्याख्यानमाले’त दि.30 रोजी त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

प्राचार्यांच्या स्मरणार्थ ही विवेक व्याख्यानमाला गेल्या 12 वर्षांपासून ‘तत्त्वबोध विचार मंच, 9 सर्कल’ आयोजित करत असून सन 2016 पासून ‘विवेकजागर पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. विविध मार्गांनी विवेकाचा जागर करणार्‍या, समाजास विवेकशील बनविण्याचा प्रयत्न करू पाहणार्‍या व्यक्तीस प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला असून आजवर तत्त्वज्ञान, समता चळवळ, मनोरुग्ण सेवा, पर्यावरण पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांस हा पुरस्कार दिला गेला आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या ‘अंजली चिपलकट्टी’ ह्या सातत्याने विविध वृत्तपत्रांतून दैनंदिन जीवनाशी निगडीत असे वैज्ञानिक विचार सोप्या भाषेत मांडत असतात. सन 2021 मध्ये लोकसत्तेच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘थांग वर्तनाचा’ ही त्यांनी लिहिलेली लेखमाला वाचकांच्या पसंतीस उतरली. स्वतःचे स्वातंत्र्य आणि निकोप जगण्याचा हक्क शाबूत ठेवण्यासाठी ‘मानवी वर्तन आणि धारणांवर होत असलेला मार्केट, माध्यमे आणि राजकारण ह्यांचा प्रभाव’ ओळखता आला पाहिजे ह्या हेतूने त्यांनी विविध ज्ञानशाखा अभ्यासून ‘माणूस असा का वागतो?’ (सप्टेंबर 2023, राजहंस प्रकाशन) हे सद्य-परिस्थितीत दीपस्तंभ ठरावे असे पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकास आणि ते लिहिल्याबद्दल लेखिका अंजली चिपलकट्टी यांस हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाच्या वतीने सचिन शिंदे यांनी सांगितले. 

यंदाच्या व्याख्यानमालेत दि. 28 रोजी सायं 7 वा. ‘दास्तान-ए-रामजी’ हा काव्यमय भाषेत सादर होणारा कथा-नाट्य कार्यक्रम होणार असून त्याचे सादरीकरण मुंबई येथील नाट्य कलाकार नेहा कुलकर्णी व अक्षय शिंपी हे करणार आहेत. दुसर्‍या दिवशी 29 डिसेंबर रोजी सायं 7 वा. सातारा येथील वैचारिक चळवळीचे एक आधारस्तंभ असलेले जेष्ठ विचारवंत श्री किशोर बेडकिहाळ यांचे ‘आजचा भारत’ ह्या विषयावर व्याख्यान असून अध्यक्षस्थानी ‘महाराष्ट्र साहित्य परिषद-शाखा फलटण’ चे माजी अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेच्या ‘मालोजीराजे कन्याशाळा, लोणंद’ येथील माजी प्राचार्य शांताराम आवटे हे असणार आहेत. दि.30 रोजी सायं.7 वा. ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक जागर पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडणार असून अध्यक्षस्थानी ‘बालकल्याण समिती, जिल्हा सातारा’ च्या अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुचित्रा घोगरे काटकर ह्या आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव हे असणार आहेत. यावेळी ‘सामाजिक पर्यावरणाचे मानवी विकासातील स्थान’ ह्या विषयावर अंजली चिपलकट्टी बोलणार असून नागरिकांनी ह्या वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश असलेल्या व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन तत्त्वबोध विचार मंचाचे महेश यादव यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!