किशोरांमध्ये तेलंगणचा तर किशोरींमध्ये झारखंडचा पाडाव
फलटण टुडे वृत्तसेवा(टिपटूर ,कर्नाटक) (क्री. प्र.) : -खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा कल्पतरू क्रीडांगण टीपटूर, जिल्हा टुमकूर कर्नाटक येथे १३ ते १७ डिसेंबर या कालवधीत होत आहेत. या स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या किशोर संघाने तेलंगणचा तर किशोरी गटात झारखंडचा पराभव करत विजयी सुरूवात केली. किशोर, किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रीक अधिकारी म्हणून खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो-खो असासेसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, पंच प्रमुख प्रशांत पाटणकर, संदिप तावडे, सुरेंद्र विश्वकर्मा यांची अधिकारी म्हणून, नितीन पानवलकर, तुकाराम माळी, पूजा सजगणे यांची पंच म्हणून नियुक्ती झाली आहे.
पहिल्या दिवशीच्या किशोर गटात साखळी सामन्यामध्ये महाराष्ट्रने तेलंगणाचा ३६-३२ असा ४ गुण आणि २ मिनीटे राखून पराभव केला. महाराष्ट्रातर्फे ओमकार सावंत (१ मि. संरक्षण व ४ गुण), प्रसाद बळीप (१२ गुण), विनायक मांगे (२ मिनिटे आणि २ गुण), महेश पाडवी (१.१० मि. आणि २ गुण), भीमसिंग वसावे (१ मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. तेलंगणातर्फे निखिल कुमार (१४ गुण) याने चांगला खेळ केला.
किशोरी गटात महाराष्ट्रने झारखंडचा ३४-१२ असा १ डाव २२ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या मैथिली पवार (३.२० मि. संरक्षण व १२ गुण), समृध्दी सुरवसे (२.२० मि. संरक्षण व ८ गुण), समृध्दी भोसले (२.२० मि. संरक्षण), मुग्धा वीर (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), वैष्णवी चाफे (नाबाद २ मि. संरक्षण) यांनी बहारदार खेळ केला व महाराष्ट्राला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेची गटवारी पुढील प्रमाणे आहे.
किशोर: अ गट: महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, मेघालय, नागालॅंड. ब गट: कर्नाटक, झारखंड, तामिलनाडू, मणिपूर, पंजाब. क गट: कोल्हापूर, पाॅडेचरी, ओडीसा, मध्यप्रदेश, सिक्कीम. ड गट: उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश, गोवा, त्रिपूरा. इ गट: केरळ, मध्यभारत, गुजरात, चंदिगड. फ गट: राजस्थान, विदर्भ, बिहार, आसाम. जी गट: हरयाणा, दिल्ली, दादरा-नगर हवेली, अरूणाचलप्रदेश. ह गट: वेस्टबंगाल, आंध्रप्रदेश, जम्मुकाश्मीर, अंदमान-निकोबार.
किशोरीः अ गट: महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, झारखंड, मेघालय, नागालॅंड. ब गट: कर्नाटक, ओडीसा, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब. क गट: दिल्ली, हरयाणा, तेलंगणा, गोवा, सिक्कीम. ड गट: राजस्थान, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर, दादरा-नगरहवेली, त्रिपूरा. इ गट: तामिळनाडू, छत्तीसगड, मध्यप्रदेश, चंदिगड. फ गट: वेस्टबंगाल, पाँडीचेरी, बिहार, आसाम. ग गट: विदर्भ, कोल्हापूर, मध्यभारत, अरूणाचल प्रदेश. ह गट: गुजरात, केरळ, हिमाचलप्रदेश, अंदमान-निकोबार.
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची कामगिरी दरवर्षी उत्तम असते. यंदाही संघ दर्जेदार असून अव्वल कामगिरीसाठी सज्ज आहे. दोन्ही संघ सुवर्णपदकाला गवसणी घालतीलच. पालघर येथे झालेल्या राज्य निवड चाचणीमधून चांगला संघ निवडला गेला आहे. त्यांचे सराव शिबिरही उत्तम झाले आहे.
– गोविंद शर्मा, सचिव, राज्य खो-खो असोसिएशन
—–
यंदाच्या हंगामातील राष्ट्रीय स्पर्धेला सुरवात झाली आहे. चांगल्या वातावरणात या स्पर्धा खेळवल्या जातात. यामध्ये निश्चित महाराष्ट्राच्या किशोर, किशोरी दोन्ही संघांची कामगिरी उत्तम राहिली आहे.
– डॉ. चंद्रजीत जाधव, सहसचिव, खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया