मुलांमध्ये आर जे महाविद्यालयाला तर मुलींमध्ये एस एस टी महाविद्यालयाला विजेतेपद
प्रथमेश दुर्गावले व कल्याणी कंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
फलटण टुडे (मुंबई,क्री. प्र.) : –
महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४१ वी अजय वर्मा फिरता रौप्य चषक खो-खो स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आली आहे. या अंतर महाविद्यालय स्पर्धेत मुला मुलींचे २० संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीच्या सामन्यात मुलांचे विजेतेपद आर जे महाविद्यालयाने पटकावताना कीर्ती महाविद्यालयाला पराभूत केले तर मुलींच्या अंतिम सामन्यात एस एस टी महाविद्यालयाने विजयी पताका फडकावताना एस एन डी टी महाविद्यालयाला पराभव चाखायला लावला.
मुलांच्या अंतिम सामन्यात आर जे महाविद्यालयाने कीर्ती महाविद्यालयावर १९-१५ असा ४ गुणांनी विजय मिळवला. आर जे महाविद्यालयाच्या धीरज भावे (नाबाद २.४० मि. संरक्षण व २ गुण), प्रथमेश दुर्गावले (२.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयश्री खेचून आणली. तर पराभूत कीर्ती महाविद्यालयाच्या अर्जुन अनिवसे (नाबाद ३ मि. संरक्षण व ३ गुण), सनी तांबे (नाबाद ३ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दिलेली लढत अपयशी ठरली.
मुलींच्या अंतिम सामन्यात एस एस टी महाविद्यालयाने एस एन डी टी (चर्चगेट) महाविद्यालयाचा १६-६ असा दहा गुणांनी पराभव केला. एस एस टी महाविद्यालयाच्या किशोरी मोकाशी (२.४० मि. संरक्षण), कल्याणी कंक (२.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयात मोठा वाटा उचलला. तर पराभूत एस एन डी टी महाविद्यालयाच्या वैष्णवी परबने (२.३० मि. संरक्षण व २ गुण) हिने एकहाती दिलेली लढत अपुरी ठरली.
तृतीय क्रमांकाच्या मुलांच्या सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३-२ असा पराभव केला तर मुलींच्या सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाने एस एन डी टी (माटुंगा) चा पराभव करत विजय मिळवला.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुढील प्रमाणे ठरले.
सर्वोत्कृष्ट संरक्षक – धीरज भावे (आर जे महाविद्यालय), किशोरी मोकाशी (एस एस टी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट आक्रमक – सनी तांबे (कीर्ती महाविद्यालय), खुशबू सुतार (एस एन डी टी)
अष्टपैलू खेळाडू – प्रथमेश दुर्गावले (आर जे महाविद्यालय), कल्याणी कंक (एस एन डी टी)