दिल्ली येथे संत शिरोमणी नामदेव महाराज रथ व साईकल यात्रेचे स्वागत करताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र साचदेवा वरिष्ठ नेता शाम जाजू,दिल्ली मराठी मंडळाचे अध्यक्ष वैभव डांगे,भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विजया रहाटकर,दिल्ली राज्य समन्वयक महेंद्र लढ्ढा
फलटण टुडे वृत्तसेवा (नवी दिल्ली : –
संत नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली पंढरपूर ते घुमान रथ पादुका व सायकल यात्रा आज दिल्लीत दाखल झाली. या यात्रेचे दिल्ली वासीयांनी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले .
पंढरपूर ते घुमान (पंजाब) पर्यंतचा सुमारे २१०० किलोमीटरचा प्रवास सायकलस्वार करत आहेत.
दिल्लीतील महाराष्ट्रवासियांनी रथयात्रेतील सहभागी सायकलस्वारांचे स्वागत, दर्शन, पादुका- पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन प्रगती मैदानाजवळील बाबा भैरो मंदिरात केले होते.
महाराष्ट्रातील ७० सायकलस्वार दररोज १०० किलोमीटरहून अधिक सायकल चालवतात. अनेक महिला या भक्ती सायकल प्रवासात सहभागी आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राष्ट्रीय सरचिटणीस विजया राहाटकर , भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष विरेंद्र सचदेवा, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, नितीन सरदारे, यात्रेचे दिल्ली समन्वयक महेंद्र लढ्ढा आदींनी पालखीचे स्वागत केले तसेच पादुका- पूजन केले. मान्यवरांच्या शुभेच्छा भाषणांनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष सुभाष भांबुरे आदींनी आयोजकांचा मानाचे वस्त्र देऊन सन्मान केला.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ व्या संजीवन समाधी दिनानिमित्त आणि शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव यांच्या ५५४ व्या प्रकाश पर्वानिमित्तही यात्रा असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांमधून जाणार आहे. ९ डिसेंबर रोजी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यात्रेचे चंदीगड येथील राजभवनात स्वागत करतील. १२ डिसेंबरला गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे ही यात्रा पोहोचेल. सर्व सायकलस्वार ५० आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. यात्रेचा प्रारंभ कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त २३ नोव्हेंबर रोजी संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास यांच्या हस्ते पंढरपूर येथे झाला.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार समिती (घुमान) आणि विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती , समता आणि बंधुतेच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही यात्रा सुरू आहे,अशी माहिती
महेंद्र लढ्ढा यांनी सांगितली.