फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई) : –
महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४१ वी अजय वर्मा फिरता रौप्य चषक खो-खो स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आली आहे. या अंतर महाविद्यालय स्पर्धेत मुला मुलींचे २० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन खो-खो व कबड्डी चे माजी राष्ट्रीय खेळाडू व माजी खोखो प्रशिक्षक दिपक राणे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मनीषा आचार्या, क्रीडा संचालक मनोज पाटील, निकिता पवार, खोखो पंच, पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेचा उद्घाटनीय मुलांचा सामना साठे महाविद्यालय व आचार्य महाविद्यालय यांच्यात पार पडला. साठे महाविद्यालयाने आचार्य महाविद्यालयाचा एक डाव ११ गुणांच्या फरकाने जिंकला. या सामन्यात साठेच्या मिहीर रामाणे (६ मि. नाबाद संरक्षण व १ गुण) याने अष्टपैलू खेळ करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
मुलांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान महर्षी दयानंद महाविद्यालयाने सिद्धार्थ महाविद्यालयावर १४-०५ असा एक डाव ९ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महर्षीच्या साहिल रानमाळे (६ मि. संरक्षण व १ गुण), हर्शल राऊत (६ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणय किंजळे (२.२० मि. व २ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर पराभूत सिद्धार्थच्या सर्वेश सोनावणे व सिद्धेश मोरे यांची कामगिरी चांगली झाली.
मुलींच्या सामन्यात एस.एन.डी.टी महाविद्यालयाने कीर्ती महाविद्यालयावर ९-८ असा चुरशिच्या सामन्यात अवघ्या एका गुणाने निसटता विजय मिळवला. या सामन्यात एस.एन.डी.टी, च्या वैष्णवी परब (२, २ मि. संरक्षण), नम्रता पांडे (१.३०, २. मि. संरक्षण व ३ गुण), खुशबू सुतार (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजयश्री खेचून आणली. तर पराभूत मनाली काजरे (४, ३.५० मि. संरक्षण व ३ गुण), साक्षी वाफेलकर (२.२०, २.४० मि. संरक्षण व १ गुण), प्राप्ती दळवी (१.५० मि. संरक्षण व १ गुण) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्यांना विजयश्रीने हुलकावणी दिलीच.
मुलींच्या आणखी एका सामान्यत यजमान महर्षी दयानंद महाविद्यालयाने एस. आय. डब्लू. एस. चा ९-३ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात मानसी आंबोकर (५ मि. नाबाद संरक्षण व ३ गुण), समीक्षा येडूरकर (१.३० मि. नाबाद संरक्षण) यांनी सामन्यात छाप पडली तर पराभूत एस. आय. डब्लू. एस. च्या अंजली प्रधान (१ मि. नाबाद संरक्षण व १ गुण), व नियती म्हात्रे यांनी बऱ्यापैकी खेळ केला.
मुलांमध्ये आर. जे महाविद्यालयाने एस. आय. डब्लू. एस. चा, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने के. एल. ई. महाविद्यालयाचा पराभव केला. तर मुलींच्या सामन्यात एस.एन.डी.टी महाविद्यालयाने सोमय्या महाविद्यालयाचा, एस. एस. टी महाविद्यालयाने रहेजा महाविद्यालयाचा पराभव केला.