फलटण टुडे दि. 01: –
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यास शासनाच्या नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विकास आराखड्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यास नियोजन विभागाकडून मान्यता देण्यात आली असून २९.७३ कोटींचा निधी आज मंजूर केला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे.
फलटण राजघराण्यातील असलेल्या राजमाता सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी व छत्रपती संभाजीराजेंच्या आई होत्या. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता सईबाई यांच्या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी विश्वस्त संस्थेकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती.
या विकास आराखड्यांतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांची ‘संनियंत्रण अधिकारी’ म्हणून नियुती केली आहे.