फलटण टुडे (सातारा दि.29 ): –
महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गाव मध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन घेणाऱ्या गावांची माहिती उपलब्ध करावी त्या गावाने उत्पादित केलेल्या मालाची ओळख देवून तेथील उत्पादनवाढ व सोयी-सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध उपलब्ध करुन जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
कृषि क्षेत्रातील नाविण्यपूर्ण गावातील सरपंच व शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांचा एक आराखडा तयार करावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, यासाठी कृषि विभाग व खादी ग्रामद्योग विभागाने मदत करावी. आराखड्यातील गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करु दिला जाईल. त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जातील, यासाठी गावातील प्रत्येक घटकाने योगदान देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मधासाठी मांघर, स्टॉबेरीसाठी भिलार, रेशिम शेतीसाठी पळशी, नाचणीसाठी कुसुंबी, ज्वारीसाठी इंजबाव, मटकीसाठी शिरवली, हळदीसाठी शहाबाद व फळ उत्पादनासाठी धुमाळवाडी ही गावे प्रसिद्ध आहेत. या गावांच्या कृषि उत्पादनवाढीसाठी मदत, प्रक्रिया प्रशिक्षण, मालाला ब्रॅडींग व बाजारपेठ पर्यटनवाढीसाठी काम केले जाईल. प्रत्येक तालुक्यातील एक गाव तरी तयार करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.