५९ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. सांगली, ठाणे वि. पुणे तर
महिलांमध्ये धाराशिव वि. ठाणे, पुणे वि. रत्नागिरी असे उपांत्य फेरीत लढणार
ठाणे व पुण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
फलटण टुडे(परभणी क्री. प्र.), १९ नोव्हेंबर :
कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महिला गटात धाराशिव वि. ठाणे, पुणे वि. रत्नागिरी तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. सांगली, ठाणे वि. पुणे असे उपांत्य फेरीत लढणार आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कै. प्रा. सुरेश जाधव क्रीडानगरीत रविवारी सकाळी झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबईने ठाणे विरुद्ध मध्यंतरापर्यंत कडवी लढत दिली. ८-७ अशी निसटती आघाडी मिळालेल्या ठाण्याने मध्यंतरानंतर बहारदार खेळी करत १९-१५ असा विजय साकारला. ठाण्याकडून संकेत कदम याने आक्रमणात सहा गडी बाद करीत १.२० मिनिटे संरक्षणाची खेळी करीत अष्टपैलू कामगिरी केली. आकाश तोग्रेने (२.०० व १.५० मि.) संरक्षणाची बाजू सांभाळली. मुंबईच्या वेदांत देसाई (२ मि. संरक्षण व २ गुण) शुभम शिगवण (१.४० व १.३० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
पुरुषांच्या अन्य तिन्ही लढती एकतर्फी झाल्या. पुण्याने सोलापूरवर १४-८, सांगलीने नाशिकवर १२-१०, मुंबई उपनगरने धाराशिववर १३-१२ असे डावाने विजय मिळविले.
महिला गटात धाराशिवने सांगलीवर १२-६ अशी मात केली. त्यांच्या ऋतुजा खरे हिने आपल्या धारदार आक्रमणात सात खेळाडू टिपले. अश्विनी शिंदे (३.१० व ४.२० मि. संरक्षण) हिने दोन्ही डावात संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. सांगलीकडून सानिका चाफे (३, १.३० मिनिटे संरक्षण व २ गुण ) हिने अष्टपैलू खेळ करीत एकाकी लढत दिली.
महिलांच्या इतर सामन्यात ठाण्याने नाशिकला १०-८ असे ५.२० मिनिटे राखून नमवले. पुण्याने मुंबई उपनगरवर १२-७ तर रत्नागिरीने सातारावर १०-५ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला.
——
हे खेळाडू उपांत्यपूर्व सामन्यात चमकले
महिला : ऋतुजा खारे, अश्विनी शिंदे (धाराशिव) सानिका चाफे (सांगली), पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (ठाणे), दीदी ठाकरे (नाशिक), प्रियांका इंगळे (पुणे) मिताली बारस्कर ( मुंबई उपनगर) श्रेया संगरे, अपेक्षा सुतार (रत्नागिरी) प्रांजल माडकर (सातारा).
पुरुष : आदित्य गणपुले, प्रसाद पवार, राहुल मंडल (पुणे ), जुबेर शेख, हबीब शेख (सोलापूर), अनिकेत पोटे, ऋषिकेश मुर्चावडे (मुंबई उपनगर), श्याम ढोबळे, भवरसिंग वसावे ( धाराशिव), सौरभ घाडगे (सांगली), विकास बैसाणे (नाशिक), संकेत कदम आकाश तोगरे (ठाणे), वेदांत देसाई, शुभम शिगवण (मुंबई).