फलटण टुडे (परभणी): –
वेग, चपळता व स्टॅमिना असलेल्या पारंपारिक खो खो खेळाला आता चांगले दिवस आले आहेत. या गतिमान खेळातील पंचांचे निर्णय चुकू शकतात. हे निर्णय खिलाडूवृत्तीने मान्य करा, असे आवाहन खो-खो खेळाडूंना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, परभणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब जामकर, भाजप गटनेत्या मंगलाताई मुदगलकर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, स्पर्धा सचिव डॉ. संतोष सावंत, सचिव डॉ. पवन पाटील, कार्याध्यक्ष डॉ. संतोष कोकीळ, प्राचार्य बी. यु. जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते ॲड शैलेश इंगळे, प्रा. जे. पी. शेळके, राज्य संघटनेचे सचिव ॲड. गोविंद शर्मा, खजिनदार ॲड. अरुण देशमुख, डॉ. प्रशांत इनामदार, कमलाकर कोळी, माजी सचिव संदीप तावडे, निवड समिती सदस्य किशोर पाटील, सुरेंद्र कुमार विश्वकर्मा, वृषाली वारद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. सुनील तुरुकमाने यांनी केले.
——
सर्व २४ जिल्ह्यांचा सहभाग
या स्पर्धेत महाराष्ट्र संघटनेशी संलग्न सर्वच्या सर्व २४ जिल्ह्यांनी भाग घेतला असल्याचे राज्य संघटनेचे सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सहभागी सर्व संघांनी बँडच्या तालात प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. अग्रभागी अहमदनगर तर शेवटी यजमान परभणी जिल्हा संचलनात सहभागी होता. ध्वजारोहणानंतर आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू शुभम जाधव याने सर्व संघांना शपथ दिली.
अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करा. खो खो च्या प्रचार व प्रसारासाठी भारतीय खो-खो महासंघ नवनवीन नियमाचे वेगळे प्रयोग करीत असते. हे करत असताना खोखो खेळाचा मूळ गाभा राहिला पाहिजे यासाठी महाराष्ट्राचा प्रयत्न असतो. आता खेळाडूंवर लाखोने बक्षिसांचा वर्षाव होत आहे. खो-खोची अल्टिमेट लीग हे खेळाडूंसाठी सर्वस्व नाही. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेकडे खेळाडूंनी लक्ष केंद्रित पाहिजे. महिलांना ओडिशाचे तर पुरुषांना भारतीय रेल्वेचे आव्हान आहे. त्यासाठी खेळाडूंनी डायट व तंत्रशुद्ध सरावाकडे लक्ष दिले पाहिजे. – डॉ. चंद्रजीत जाधव, सहसचिव भारतीय खो-खो महासंघ.