३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – खो खो महाराष्ट्राची दुहेरी सुवर्ण पदकाची हॅटट्रिक !!

महाराष्ट्राने ओडिशाला दिला दुहेरी सुवर्ण पदकाचा दणका

महाराष्ट्राने ओडिशा विरुध्द उडवला दुहेरी सुवर्ण पदकाचा डबल बार  
फलटण टुडे (फोंडा, गोवा ८ नोव्हें; क्री. प्र.) : 
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खो-खो विभागात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत प्रथमच हॅटट्रिकसह दुहेरी सुवर्ण पदकाचा बार उडवून दिला आहे. खरतर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरवातीपासूनच मोठे विजय साजरे करत सुवर्ण पदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले होते. यापूर्वी केरळ येथे झालेल्या २०१५ सालच्या स्पर्धेत व त्यानंतर झालेल्या २०२२ च्या गुजरात स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदक मिळवले होते व आता गोवा येथे हॅटट्रिक साजरी केली.

आज झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा ७२-२६ (मध्यंतर ३६-१२) असा धुव्वा उडवला. सामन्यात सुरवातीपासूनच महाराष्ट्राने वर्चग्स्व राखले होते सुयश गरगटेने २ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवले, फैझांखा पठाणने २ मि. संरक्षण करून ८ गुण मिळवले, वृषभ वाघने २ मि. संरक्षण केले. तर कर्णधाराची खेळी करताना रामजी कश्यपने १ मि. संरक्षण करून तब्बल १२ गुण वसूल केले. तर आदित्य गणपुलेने १:५० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले व मोठ विजय निश्चित केला. तर पराभूत ओडिशाच्या विशाल ओरामने १.३० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले तर अर्जुन सिंघने १ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवत दिलेली लढत अपुरी ठरली.   

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर ४६-४० असा दणदणीत विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेने २.१०, १.३० मि. संरक्षण करत ८ गुणांची कमाई केली, प्रियांका भोपीने १.२२, १.५० मि. संरक्षण करत ४ गुण मिळवले. काजल भोरने आक्रमणात ८ गुण वसूल केले, गौरी शिंदेने १.२८ मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. तर पराभूत ओडिशाच्या माधुमिताने १.३६ मि. संरक्षण करत तब्बल १० गुण वसूल केले तर रंजिताने १.०८ मि संरक्षण करत ४ गुण मिळवत जोरदार लढत दिली मात्र महाराष्ट्राने त्याची डाळ शिजू दिली नाही.  

पुरुषामध्ये केरळ व आंध्र प्रदेश तर महिलांमध्ये कर्नाटक व केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले.      

पुरुषांचे प्रशिक्षक डलेश देसाई व महिलांचे प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ यांनी दुहेरी सुवर्णपदकाची हॅटट्रिक करू शकलो याबद्दल आनःद व्यक्त केला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या मॅटवर हॉत आहेत व महाराष्ट्राच्या खेळाडूंना त्याचा चांगलाच अनुभव असल्याने विजय मिळवणे सोपे झाले. ड्रीम रण हि नवीन संकल्पना या स्पर्धेत वापरली गेली. एका तुकडीतील कोणीही तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानात राहिल्यास एक अतिरिक्त गुण दिला जातो व त्यानंतर प्रत्येक अर्ध्या मिनिटाला एक अतिरिक्त गुण तुकडीतील शेवटचा खेळाडू बाद होईपर्यंत मिळतो याचा फायदा महाराष्ट्राला खूप झाल्याचे दोघांनी सुध्दा सांगितले. त्याच बरोबर चंद्रजीत जाधव, गोविंद शर्मा, सचिन गोडबोले व अरुण देशमुख या महाराष्ट्राच्या पदाधीकाऱ्यांनी त्यच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!