अण्णा भाऊ साठे समजून घेणे काळाची गरजआहे. साहित्यिक ताराचंद्र आवळे

फलटण टुडे (फलटण )
प्रत्येकाने आपले आयुष्य कसे जगावे हे ठरविले पाहिजे. मानवी जीवन ही एकदाच मिळालेली संधी आहे तिचा योग्य उपयोग करुन घेतला तर जीवनाचे नंदनवन होते. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मानवी मूल्यांची पेरणी करताना दिसते. त्यांच्या साहित्यात मानवतावाद तसेच माणुसकीचे दर्शन घडते व अन्यायाविरुद्ध चीड निर्माण झालेली दिसते. त्यामुळे अण्णा भाऊ साठे समजून घेणे काळाची गरज आहे. असे मत प्रमुख वक्ते व साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त पंचबिघा गोखळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव गावडे, प्रगतशील शेतकरी डॉ. राधेश्याम गावडे, मार्केट कमिटी संचालक डॉ. ज्ञानदेव गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे,तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, जयंती पुण्यतिथी साजरी करताना माणसांची मस्तक सुधारण्यासाठी वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. बाल पणापासून बंडखोर असणारे अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, कविता, लावणी, छक्कड,पोवाडे, प्रवासवर्णन, वगनाट्य, नाटके, चित्रपट गीते असे विपुल लेखन केले. त्यांच्या साहित्याला शासनाचे पुरस्कार मिळाले त्यामुळे त्यांची साहित्य संपदा म्हणजे मानवी मूल्यांचा खजिना आहे. म्हणुन त्यांचे साहित्य वाचले पाहिजे व जगण्याची दिशा ठरवली पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ये आझादी झुटी है देश की जनता भुखी है म्हणुन प्रबोधन करणारे ते आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. 
यावेळी वृषाली भिसे या विद्यार्थिनीने रोखठोक भाषेत आपले मत मांडले. तसेच बापू दणाने या विद्यार्थ्यांने बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला यांबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक विजय केंगार यांनी आपल्या सुश्राव्य वाणीने केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ पाटोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष रणजित दणाने, संदीप पाटोळे, प्रशांत दणाने,अजय आवळे, सोमनाथ दणाने व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!