बारामती चे सुपुत्र अजिंक्य जनार्दन साळी यांनी कझाकीस्थान येथे संपन्न झालेली ” आयर्नमॅन ” स्पर्धा पूर्ण करत एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. भारतातील शिक्षकांमधून पहिला शिक्षक आयर्नमॅन होण्याचा विक्रम अजिंक्य साळी यांनी केला आहे. आयर्नमॅन होण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत “आयर्नमॅन ” हा जगविख्यात मानला जाणारा मानाचा किताब मिळविला आहे.
‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा मंत्र सर्वदूर पोहचविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा पूर्ण केली व आयर्नमॅन सतीश ननवरे यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांचेच मार्गदर्शन तसेच आई-वडील सर्व शुभचिंतक,जनहित प्रतिष्ठानचे प्राथ.माध्य,विद्यालय, व बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सर्व सदस्य, नियमित व्यायाम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचे प्रेम आणि शुभेच्छांमुळे ही किमया साकार केल्याचे अजिंक्य साळी यांनी सांगितले.
आयर्नमॅन होण्यासाठी 3.8 .कि.मि पोहणे, 180 कि.मि. सायकलिंग आणि 42.2कि.मि धावणे हे आव्हान पूर्ण करावे लागते. त्याठिकाणी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरण असतांनाही या खडतर परिस्थितीवर मात करीत अजिंक्य साळी यांनी हे आव्हान 14 तास 13 मिनिटांत पूर्ण करून आयर्नमॅन हा किताब मिळवला.