फलटण टुडे ( बारामती ):-
बारामतीत झाली कोचिंग क्लासेसची बैठक. संघटना स्थापनेवर एकमत
बारामती: प्रतिनिधी
बारामती हा तालुका असून सुद्धा जिल्हास्तरीय सर्व सेवा, व सुविधा उपलब्ध असल्याने व शिक्षण क्षेत्रातील सर्व पर्याय उपलब्ध होत आहेत त्यामुळे गुणवत्ता व दर्जा देत असताना येणाऱ्या काळात बारामती राज्यामध्ये ‘एज्युकेशन हब’ म्हणून ओळखले जाईल असा विश्वास बारामती शहर आणि तालुक्यातील संस्थाचालकांनी व्यक्त केला
बारामती शहरातील कोचिंग क्लासेस, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरतीसाठी तयारी करून घेणाऱ्या संस्था, जेईई, नीट, एनडीए सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणाऱ्या संस्था यांच्या चालकांची एकत्रित बैठक मंगळवार दि .२७ जून रोजी बारामती येथील कृष्ण सागर हॉटेलमध्ये पार पडली. शहरातील बहुसंख्य संस्थांचे चालक आणि प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते.
बारामती हे एज्युकेशन हब म्हणून पुढे येते आहे. नजीकच्या भविष्यकाळात लातूरला मागे टाकण्याची क्षमता बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. अशावेळी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन राज्यातील आणि देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी बारामतीत कसे येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या बैठकीत सहभागी संस्था चालकांनी सांगितले.
बारामतीच्या विकासामध्ये येथील शैक्षणिक क्षेत्राचे मोठे योगदान आले आहे. त्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांमुळेही येथे राज्यातून हजारो विद्यार्थी येत आहेत. त्यांच्यामुळे शहराच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळत असून शेकडो जणांना रोजगार मिळतो आहे. या संस्था शेकडो गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवत आहेत. त्यामुळे या संस्थांकडे शासनानेही सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. कोचिंग क्लासेससाठी नियमावली बनविण्याचे काम सध्या केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे, कोचिंग क्लासेसचा देशातील व्यवसाय एक लाख करोड पेक्षाही जास्त असल्याने केंद्र सरकार गांभीर्याने या विषयाकडे पाहत आहे. या नियमावलीचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर त्याचे बंधन सगळ्याच खाजगी शैक्षणिक संस्थांना पडणार आहे. त्यामुळे त्या अगोदरच आपली तयारी असणे गरजेचे आहे यासाठी संघटना बांधणी करणे आवश्यक असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या कोचिंग क्लासेसचे प्रश्न वेगळे असतात. सीईटी,जेईई, नीट, एनडीएची तयारी करून घेणाऱ्या संस्थांचे प्रश्न वेगळे असतात तर पोलीस भरती किंवा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांचे प्रश्न वेगळे असतात, या सगळ्यांचा विचार संघटनेने करावा असेही मत काही संस्थाचालकांनी व्यक्त केले. एकाच बैठकीत कार्यकारणी तयार करण्यापेक्षा दर महिन्याला सर्व संस्था चालकांनी अनौपचारिकरित्या एकत्र बसावे. सर्वांना उपयोगी चार-पाच मुद्दे घेऊन त्यावर चर्चा करावी. त्यातून सर्वांमध्ये एकोपा निर्माण होऊन संघटना उभारणी करणे सोपे होईल यावर या बैठकीत एकमत झाले.