फलटण टुडे (बारामती ) : –
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये “उद्योजकता” या विषयावरील कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपक सोनवणे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी विना मधुरे हिने अत्यंत मोजक्या शब्दात करून दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कु. समर्थ भोईटे हे लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख पाहुण्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थांनी समर्थाला त्याच्या या यशस्वी वाटचालीबद्दल अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या या सर्व प्रश्नांना त्याने अत्यंत दिलखुलासपणे उत्तरे दिली. समर्थ सध्या विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान , वाणिज्य महाविद्यालय बारामती येथे ११वी कॉमर्स या शाखेत शिक्षण घेत घेत असून त्यासोबतच तो डिप्लोमा इन अँनिमेशन शिकत आहे. आठवीच्या वर्गात शिकत असताना त्याने या लहान वयात Rs Developers and Designer त्या कंपनीचे पुढे रीबँड करून Softmoksa व RS Animates या नावाच्या दोन कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून तो परदेशातील लोकांची ऑनलाईन कामे करतो. सध्या त्याचे आपल्या देशा सोबतच USA, UK, Nigeria, Singapore, Qatar, Australia, Malaysia या देशातील ग्राहकांबरोबर काम चालू आहे. त्याने www.rsanimates.com या नावाने स्वतःची वेबसाईड तयार केली आहे.
त्याने आज पर्यंत बॉलिवूड व मराठी इंडस्ट्री मधील चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स देण्याची कामे केली आहेत. जे वय मुलांचे खेळायचे दंगा मस्ती करायचे असते त्या वयात समर्थने दोन कंपन्या व स्वतःची वेबसाईड सुरु केली हि आपणासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सध्या त्याच्या या कंपन्यात ४२ कर्मचारी काम करतात. समर्थने त्याच्या कार्य कर्तृत्वाच्या रूपाने बारामतीच्या नावलौकिकात भर घातल्या बद्दल एन्व्हॉर्यमेंटल फोरम बारामती यांच्या मार्फत २०२३चा “बारामती आयकॉन” हा पुरस्कार देऊन कु. समर्थ भोईटे यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा या महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समर्थ पासून प्रेरणा घेऊन उद्याचे अनेक तरुण उद्योजक घडावेत हा होता. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. निर्मल साहुजी, डॉ. संताजी शिंदे, डॉ. अपर्णा सज्जन, समर्थचे पालक सुभेदार श्री. राहुल भोईटे, श्री. शशांक दंडवते, श्री. संतोष जानकर, प्रसारमाध्यम विभागाचे समन्वयक श्री. सुनिल भोसले हे सर्वजण उपस्थित होते. यासंपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.