फलटण टुडे(बारामती ):
देसाई इस्टेट येथील कु. गौरी राजेंद्र गोफणे हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ ह्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात मंडल कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
गौरीचे प्राथमिक शिक्षण सोमंथळी तालुका फलटण येथे व माध्यमिक शिक्षण म. ए. सो हायस्कूल बारामती येथे झाले. टी सी कॉलेज बारामती येथे अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मा. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथे पदवीचे शिक्षण व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. गौरी सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पी एच डी चे शिक्षण घेत आहे.
गौरी उत्तम बॅडमिंटन पटू असून तिने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन मॅचेस मध्ये कोटा ( राजस्थान ) , तिरुपती (आंध्र प्रदेश) आणि अकोला येथे राहुरी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत बारामती येथे झालेल्या इंटर कॉलेज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला गौरीने प्रथमच सुवर्णपदकही मिळवून दिले आहे.