फलटण टुडे ( फलटण ) :
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण या संस्थेच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ३० व्या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले, ता. देवगड,जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथीनिमित्त (दि.17 मे ) आयोजित अभिवादन कार्यक्रमात केली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे संचालक प्रा. राजेंद्र मुंबरकर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह, कवी ताराचंद्र आवळे, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अलका बेडकीहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, “मराठी पत्रकारांच्या कार्याचा सन्मान म्हणून संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय ‘दर्पण ‘ पुरस्कारांचे वितरण सन 1993 पासून केले जात असल्याचे “, बेडकीहाळ यांनी सांगून यंदाचे पुरस्कार जाहीर केले ते पुढील प्रमाणे –
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना तर ‘साहित्यिक गौरव दर्पण पुरस्कार’ नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक व नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व अभ्यास केंद्राचे संचालक भगवान लक्ष्मणराव अंजनीकर यांना तसेच कराड येथील जेष्ठ पत्रकार शंकरराव पाटील पुरस्कृत ‘धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार’ कृतिका (श्वेता) पालव – मुख्यसंपादिका ‘धावती मुंबई’ व ‘सन्मान महाराष्ट्र न्यूज’ (डोंबिवली ) यांना घोषित करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय ‘दर्पण ‘ पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य पत्रकारांमध्ये प्रशांत कदम – विशेष प्रतिनिधी, ‘एबीपी माझा’, नवी दिल्ली, डॉ. सागर देशपांडे – मुख्य संपादक मासिक जडण – घडण, पुणे, श्रीकांत कात्रे – आवृत्ती प्रमुख दैनिक ‘प्रभात’, सातारा, शशिकांत सोनवलकर – पत्रकार, दुधेबावी, ता. फलटण, विक्रम चोरमले – प्रतिनिधी ‘दै.सत्य सह्याद्री’, फलटण यांचा समावेश आहे.
या दर्पण पुरस्काराचे स्वरूप रोख रु.२,५००/- व सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट, शाल, श्रीफळ असे असून या सर्व पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिन दि.६ जानेवारी२०२४ रोजी पोंभुर्ले, ता. देवगड येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही यावेळी बेडकिहाळ यांनी सांगितले.