फलटण टुडे (बेंगलोर, 3 मे क्री. प्र.) :
उद्घाटनीय सामन्यात इंडिया डेव्हलपमेंट संघाने सिंगापूरवर १४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात इंडिया डेव्हलपमेंट संघाने निर्धारित 16 ओव्हरमध्ये ६४ धावा केल्या तर सिंगापूरला 16 ओव्हरमध्ये ५० धावात रोखत इंडिया डेव्हलपमेंटने विजयी सलामी दिली.
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनंने (IISF) बेंगलोर मध्ये न्यूझीलंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन XLR8 इनडोअर स्पोर्ट्स एरिना, हेन्नूर बागलुर मेन रोड, दक्षिण आशिया बायबल कॉलेजच्या पुढे, कोठनूर, बेंगळुरू, कर्नाटक 560077 येथे केले आहे. या स्पर्धेत यजमानं भारतासह, न्यूझीलंड, श्रीलंका, युएई व सिंगापूर हे देश सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत खुला गट व मास्टर्स (४०+) गटाचे संघ सहभागी झाले आहेत.
इंडिया डेव्हलपमेंट विरुद्ध सिंगापूर या सामन्यात इंडिया डेव्हलपमेंट संघाच्या दर्शन (२१ धावा ३ विकेट), शुभम (१३ थावा व दोन विकेट) व चेतन शहा (१२ धावा) यांनी चमकदार कामगिरी केली तर सिंगापूरच्या तमिम व विपुल यांनी (प्रत्येकी १५ धावा व २ विकेट) जोरदार लढत दिली होता मात्र इंडिया डेव्हलपमेंट संघाने विजयश्री खेचून आणली.
दुसऱ्या एका सामन्यात श्रीलंकेने इंडियावर ६९-६७ असा दोन धावांनी निसटता विजय मिळवला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. तर आणखी एका सामन्यात न्यूझीलंडने युएईवर ११०-६८ असा ४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
सायंकाळच्या सत्रात इंडिया संघाने सिंगापूरचा 91 धावा करत 80 धावांनी पराभव केला. तर सिंगापूरला 16 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा करण्यात यश आले. सिंगापूरच्या 14 वेळा खेळाडूला बाद करण्यात इंडियाला यश आल्याने सिंगापूरला 70 धावांचा फटका बसला (प्रत्येक बाद खेळाडूमुळे 5 धावा कमी होतात.) तर इंडियाच्या फलंदाजीवेळी 4 खेळाडूंना बाद करण्यात सिंगापूरला यश आले. या सामन्यात इंडियाच्या धनुश (14 धावा, 4 विकेट), आशिक (18 धावा, 1 विकेट), नमशिद (15 धावा, 3 विकेट) यांच्या कामगिरीच्या जोरावर सहज विजय मिळवला तर सिंगापूरच्या कार्तिकने (12 धावा, 2 विकेट) केलेली खेळी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरली.
आज झालेल्या शानदार कार्यक्रमाने स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी टोनी वॅटिकन अध्यक्ष (WICF), अजय नाईक, अध्यक्ष (IISF), मिलिंद पुंजा, सेक्रेटरी (IISF), जे के. महिंद्रा, संस्थापक (DTDC), क्षितिज वेदक, संस्थापक चेअरमन व बाळ तोरसकर, संस्थापक सेक्रेटरी, (महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन) त्याचबरोबर इनडोअर क्रिकेट मधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.