फलटण टुडे (फलटण) : –
यंदाची निवडणूक ही बिनविरोध होईल असे वाटत असतानाच समाजातील काही अपप्रवृत्तींनी ही निवडणूक शेतकऱ्यांच्यावर लादली पण बरं झालं ही निवडणूक लागली कारण या निमित्ताने का होईना सर्व जिवाभावाच्या कार्यकर्त्यांशी, लोकांची संवाद साधता आला व यामधून निश्चितपणे जवळीकच वाढली असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले ते साखरवाडी पाच सर्कल येथील मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मतदार मेळाव्यात बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महानंदा दूध मुंबईचे व्हाईस चेअरमन डि.के. पवार, फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव रणवरे, जिंतीचे उपसरपंच शरद रणवरे, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे माजी अध्यक्ष गोकुळदात्या रुपनवर, निंभोरेचे उपसरपंच मुकुंद रणवरे, राजेंद्र भोसले आदी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, श्रीमंत रघुनाथराजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना माफक दरामध्ये पेट्रोल डिझेल मिळावे यासाठी पेट्रोल पंपांची निर्मिती केली तसेच अनेक ठिकाणी गाळे बांधुन, विविध फळांची बाजारपेठ उभारुन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. यामुळे या बाजार समितीचे नाव राज्यांमध्ये झाले व या बाजार समितीला “अ” वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.गेली अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार श्रीमंत रघुनाथराजे यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविल्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करून यामध्ये ते यशस्वी झाले आहेत.
श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सुटला हा पाणी प्रश्न सोडवित असताना तुमच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मोलाचे सहकार्य श्रीमंत रामराजे यांना लाभले आणि कायमस्वरूपी दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न श्रीमंत रामराजे यांच्यामुळे सुटला असल्याचेही शेवटी श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले. यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रवीण रणवरे यांनी केले. तर आभार शरद रणवरे यांनी मानले.