कपाळावर चंद्रकोर , रायबा /जिवा महाला / तानाजी मालुसरे / नेताजी पालकर अशा नावांचे ग्रुप अन् हर हर महादेव , छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा जल्लोषात एक अनोखी मोहीम राबवली गेली.
आपले गड किल्ले माहिती होण्यासाठी अनेक वेळा मुलांना घेऊन गड किल्ल्यांवरती चढाई केली जाते पण बारामतीच्या कीप अन रोलिंग स्केटिंग क्लबच्या ५० मुलांनी आणि त्यांचे प्रशिक्षक तानिष्क सचिन शहा यांनी अफजल खान व शिवाजी महाराज यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध असलेला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील प्रतापगड किल्ला स्केटिंग घालून ४००पायऱ्या चढून एक अनोखा विक्रम नोंदवला. या पुर्ण ४०० पायऱ्या फक्त १/२ ते पाऊण तासात ही मुलं चडून गेली.
यामध्ये ५ वर्षापासून 14 वर्षापर्यंतची मुले होती. व प्रत्येकाने न थकता सकाळी ७ वाजता चढायला चालू केलेला गड ८ वाजता चढून पूर्ण केला.
खरंतर आजकालची पिढी फिरायला जायचं म्हटलं की रिसॉर्ट सारखे ठिकाणे शोधते पण आज या मुलांनी गड स्केटिंग घालून चढून सगळ्यांनाच एक वेगळे प्रोत्साहन दिले आहे.
या मुलांबरोबर त्यांचे प्रशिक्षक तनिष्क शहा स्वतः स्केटिंग घालून गड चढले. या अनोख्या कामगिरीसाठी ही मुले गेले २ महिने तयारी करत होती . बेबी स्टेप्स , क्रॉस लेग , साईड वॉक अशा अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धती त्यांना खास गड चढण्यासाठी तनिष्क सरांनी शिकवल्या होत्या . आणि त्याच जोरावर या मुलांनी कोठेही न थकता एका दमात गडाची स्केटिंग घालून चढाई केली.
फक्त एवढ्यावरच न थांबता इथे आल्यानंतर पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी याच मुलांनी प्रतापगडाच्या गोष्टीचा पोवाडा सुंदर असे शिवाजी महाराज अफजल खान मावळे जिजाऊ असे पोशाख घालून स्केटिंग वर साजरा केला.
या अशा पहिल्यांदाच होणाऱ्या वेगळ्या कामगिरीमुळे पालक वर्गातून खूप कौतुक होत आहे तसेच आपल्या बारामतीचे नावही एका वेगळ्या स्तरावर उंचावले गेले आहे.