फलटण टुडे (सातारा, दि. 7 ) : बोगस डॉक्टर शोधण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केलेल्या आहेत. या समित्यांनी पोलीस विभागाच्या मदतीने जिल्हयातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर कारवाई समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, डॉ. प्रमोद शिर्के, डॉ. मिथुन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बोगस डॉक्टरांनी अनेकदा चुकीचे उपचार केल्यामुळे रुग्णांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. काही वेळा रुग्णांचा मृत्यु होण्याचीही शक्यता असते. तालुकास्तरीय समित्यांनी व पोलीस यंत्रणेने अधिक सक्षमपणे काम करुन बोगस डॉक्टर शोधावेत. तसेच नागरिकांनीही आपल्या परिसरात बोगस वैद्यकीय व्यवसायिक वैद्यकीय व्यवसाय करताना आढळल्यास संबंधित पोलीस स्टेशनमध्ये किंवा संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना कळवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केले.