फलटण टुडे (सातारा, दि. ७ ) :
जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य मंत्री डाँ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आणि आरोग्य विभागाच्या वतीने आज दि. ७ एप्रिलपासून जागतिक आरोग्य दिनानिमित्त “सुंदर माझा दवाखाना” ही नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य दिन २०२३ ची थीम “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य” अशी आहे. जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य संपूर्ण जगभरात समान आरोग्यसेवा, सुविधाबद्दल जागरूकता पसरवणे आणि आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे असे आहे. याचा प्रसार करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी स्वच्छ सुंदर आरोग्य संस्था या संकल्पनेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. स्वच्छ सुंदर दवाखाना हेच रुग्णांचे माहेरघर असते, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी रुग्णालयीन परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वतः ते या उपक्रमात सहभागी झाले.
यावेळी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. सुंदर माझा दवाखाना या उपक्रमात आरोग्य संस्था परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृह, भांडार गृह इत्यादींची स्वच्छता करण्यात येत आहे तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्याच्या आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे फलक लावण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाषकदम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी कुलकर्णी, शल्यचिकित्सक डॉ राहुल जाधव, डॉ राहुल खाडे, डॉ. अरुंधती कदम, डॉ.संजीवनी शिंदे, अधिसेविका श्रीमती सरला पुंड, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.