दुहेरी विजेतेपद पटकावत भारताकडून विजयी गुढी आशियाई खो-खो स्पर्धा ; नेपाळच्या पुरुष व महिला सघांना उपविजेतेपद

४ थी आशियाई खो-खो स्पर्धा

फलटण टुडे(मुंबई,२३ मार्च क्री. प्र.) : 
तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे सपन्न झालेल्या ४ थ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघांनी नेपाळच्या संघांवर मात करताना जागतिक स्तरावर विजयाची गुढी उभारली.

मूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सपन्न झालेल्या या स्पर्धेचे अंतिम सामने गुरुवारी (ता. २३) दुपारी झाले. मॅटवर झालेल्या या स्पर्धेत महिला गटामध्ये नेपाळ संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी नोंदवली होती; परंतु भारताच्या महिला संघामध्ये अनुभवी आणि दर्जेदार खेळाडूंचा समावेश असल्यामुळे अंतिम सामना एकतर्फी झाला.

भारताने नेपाळचा ४९-१६ असा एक डाव ३३ गुणांनी धुव्वा उडवत पराभव केला. विजयी भारतीय संघाकडून गौरी शिंदे (नाबाद १.१५ मिनीटे संरक्षण व ४ गुण), दिपीका चौधरी (२.१० मिनीटे संरक्षण व २ गुण), मिनू (१.४०, २.४० मिनीटे संरक्षण), प्रियांका इंगळे (१.५५ मिनीटे संरक्षण व २ गुण), अपेक्षा सुतार (४ गुण) यांनी चांगला खेळ करत विजयात जोरदार कामगिरी केली. नेपाळतर्फे बिनू तानंनगा (१.१० मिनीटे संरक्षण व ६ गुण), पुजा ओद (४ गुण) वगळता अन्य खेळाडूंना चांगली कामगिरी नोंदवता आली नाही.

तत्पुर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नेपाळने श्रीलंकेचा एक डाव ५९ गुणांनी (६७-०८) तर भारताने बांग्लादेशचा एक डाव ४९ गुणांनी (६९-२०) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ३८-३२ असा एक डाव ६ गुणांनी पराभव केला. भारताच्या धारदार आक्रमणापुढे नेपाळच्या संरक्षकांची फळी टिकाव धरु शकली नाही. भारतीय खेळाडूंनी सुर मारुन व खुंटात गडी बाद करण्याच्या कौशल्याचा चांगला फायदा करुन घेतला. कर्णधार अक्षय भांगरे (१, १ मिनीटे संरक्षण व ४ गुण), अनिकेत पोटे (६ गुण), अक्षय गणपुले (१.२० मिनीटे संरक्षण), अमित (१.१०, १.१० मिनीटे संरक्षण व २ गुण) यांनी बहारदार खेळ करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. नेपाळतर्फे धर्मा (१.२० मिनीटे संरक्षण), बिकामा (१.१० मिनीटे संरक्षण व ६ गुण), बिश्‍वा (८ गुण) यांनी चांगला खेळ केला.

तत्पुर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुरूष गटात भारताने श्रीलंकेचा ४५ गुणांनी (७९-३४) पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात नेपाळने बांग्लादेशचा चुरशीच्या सामन्यात २ गुणांनी (३७-३५) असा पराभव केला होता. एकुण स्पर्धेमध्ये बांग्लादेशने चांगली कामगिरी केली होती. मात्र नेपाळकडून त्यांचा पराभव पत्करावा लागला.

४ थ्या आशियायी स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे परितोषीक महिला आणि पुरुष संघामध्ये उपांत्य पराभूत श्रीलंका व बांग्लादेश या दोन संघाना देण्यात आले आहे. स्पर्धेचे पारितोषीक वितरण आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटेरिया, बोरॉलॅण्डचे प्रमुख प्रमोद बोरा, खो-खो फेडरेशन ऑफचे अध्यक्ष सुधांशु मित्तल, सचिव एम. त्यागी, स्पर्धा समिती सदस्य व सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, सचिन गोडबोले, महाराष्ट्राचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, राणी तिवारी यांच्यासह आसाममधील खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!