फलटण टुडे(सातारा, दि. 20 ) :-
संस्कारक्षम पुढील पिढी घडविण्यात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे योगदान महत्वाचे आहे. या योगदानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात आदर्श अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्या वेळी श्री. जयवंशी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील, समृदी जाधव आदी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका मुलांचा ताई व आई प्रमाणे सांभाळ करतात, असे सांगून श्री. जयवंशी म्हणाले, अंगणवाडीतील मुलांवर चांगले संस्कार करण्याचे महत्वाचे काम या सेविका करतात. जे संस्कार घरानंतर अंगणवाडीमध्ये मिळतात तेच संस्कार घेऊन मुले चांगल्या भविष्याची वाटचाल करतात. एक आदर्श नागरिक होतात. आजच्या या सोहळ्यात पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व सेविका, पर्यवेक्षिका व मदतनिस या कौतुकास पात्र आहेत मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
यावेळी मिशन धाराऊ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलचीही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी पहाणी केली. यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मतदनिस, पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.