४ थी आशियाई खो-खो स्पर्धा
फलटण टुडे (गुवाहाटी, २१ मार्च क्री. प्र.) :
तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे सुरु असलेल्या ४ थ्या आशियाई खो-खो स्पर्धेत पुरुष गटामध्ये साखळी फेरीत यजमान भारताने भूतानवर सहज मात करत विजयी सुरवात केली. तर महिलांमध्ये यजमान संघाने दुसरा विजय नोंदवत गटात अव्वल कामगिरी केली.
तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन्ही गटात प्रत्येकी चार-चार देशांचे संघ सहभागी झालेले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारताचे दोन्ही संघ तगडे आहेत. पुरुषांच्या गटातील पहिला सामना भारताने सहज जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने भूतानचा ४७-३४ असा १ डाव १३ गुणांनी पराभव केला. प्रथम आक्रमण करत भारतीय संघाने ४७ गुण मिळवले. यामध्ये अनिकेत पोटे (३ गुण), अद्वेत पाटील (३ गुण) यांनी जोरदार आक्रमणाचा खेळ केला. भूतानला दोन्ही डाव मिळून ३४ गुणच मिळवता आले. विजयी संघातर्फे गौतम एम के व अक्षय गणपुले यांचा खेळ चांगला झाला.
अन्य सामन्यांमध्ये बांग्लादेशने इंडोनेशियाचा एक डाव ६० गुणांनी (८०-२०) असा पराभव केला.
महिला गटात यजमान भारतीय संघाने साखळी सामन्यात दुसरा विजय नोंदवला. यामध्ये मलेशियाला १ डाव ६४ गुणांनी (७९-१५) पराभूत केले. विजयी संघातर्फे गौरी शिंदे (१ मि. संरक्षण आणि ४ गुण), निकिता पवार (१.३० मि. संरक्षण व २ गुण), परवीन निशा (२ मिनीटे संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (६ गुण) यांनी चांगला खेळ केला. मलेशियाकडून नजारा नांदियाने (४ गुण) चांगला खेळ केला.
अन्य सामन्यात नेपाळने कोरीयाचा एक डाव २४ गुणांनी (४०-१६) असा पराभव केला.