फलटण टुडे ( विडणी दि २१ ) : –
विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलने १३/० असा भाजपचा ‘व्हाईट वॉश’ करून विडणी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व कायम राखले.
फलटण तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणार्या सर्वात मोठ्या विडणी सोसायटीच्या निवडणुकीकडे फलटण तालुक्याचे अनेक दिग्गज नेतेमंडळीच लक्ष देऊन होते. १३ संचालक पदासाठी २७ उमेदवार उभे असल्याने दुरंगी लढत होती.
या सोसायटीवर सत्ता काबिज करण्यासाठी आमदार, खासदारांसह अनेक दिग्गज नेते निवडणूक प्रचारात उतरल्याने अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा कडाडल्या. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची झाली होती.
या निवडणुकीसाठी विडणी जि.प.शाळेच्या खोल्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सोसायटीच्या १९०७ सभासदांपैकी १६३३ सभासदांनी मतदान केले. यामध्ये ७८ मते बाद झाल्यामुळे १५५५ मते वैध झाली. सायंकाळी ५ ते रात्री सात पर्यंत मतमोजणी सुरू होती.
विडणी सोसायटीच्या सूज्ञ सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेस राजेगटाच्या बाजूने कौल देऊन उत्तरेश्वर पॅनलच्या १३ पैकी १३ जागांवर उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर साळुंखे यांनी जाहीर केले. भाजपप्रणीत विडणी विकास आघाडीचा मोठ्या मताधिक्क्याने दारुण पराभव झाल्याने विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलने निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून विडणीतील राजेगट समर्थक ज्येष्ठ व युवा वर्गाच्या बहुमोल योगदानामुळे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
विजयी उमेदवार रामदास नाळे ८९७, साहेबराव ननावरे ८९३, बाळू पवार ८७५, मारुती उर्फ श्रीनिवास पवार ८७६, किसन शेंडे ८७८, विलास अभंग ८४८, अशोक अभंग ८३८, सोनबा आदलिंगे ८३६, जयश्री टिळेकर ९३६, विजया पवार ९२९, मुरलीधर जगताप ९४०, लक्ष्मण कोकरे ८८२, मारुती नाळे ९७५ हे तेरा संचालकपदी निवडून आले.
या विजयी उमेदवारांचे विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.