**
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) : –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण डिप्लोमा विभाग यांच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्याला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डाॅ. नरेंद्र नार्वे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेच्या बरोबरीने कौशल्य विकास करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणार असल्याचे सांगितले. फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेला अभियंत्यांना नोकरी व व्यवसाय यातील संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत प्रशिक्षण देणे गरजेचे असुन ते दिल्यानंतर विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकू शकतात असे प्रतीपादन केले.
डिप्लोमा मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.ज्योती टिळेकर यांनी या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा सादर केला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत अहवाल सादर केला. त्या नंतर डिप्लोमा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
फलटण एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असुन फलटण मधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण फलटण मध्येच उपलब्ध व्हावे म्हणून सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण घेत असताना आर्थीक अडचण येऊ नये म्हणून शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना असुन शासनाच्या या योजनांबरोबरच महाविद्यालय प्रशासनाच्या माध्यमातून व इतर खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असते या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करुन या योजनांबाबत विद्यार्थी व पालक यांना प्रा. शांताराम काळेल यांनी अवगत केले.
डिप्लोमा प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. रमेशचंद्र पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. अमर रणवरे यांनी आभार प्रदर्शन केले.
डिप्लोमा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर,प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.