**
फलटण टुडे ( फलटण दि. १५ ) :
देशभर पसरलेले दूषीत वातावरण बदलण्यासाठी महापुरुषांचे आदर्श आणि विचारांचा जागर करुन हे आदर्श आणि विचार समाजात अधिक खोलवर रुजवावेत लोकशाही अधिक मजबुत व्हावी आणि सामाजिक वातावरणात पुन्हा सकारात्मकता निर्माण करण्याची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपक राजेशिर्के यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेल आयोजित राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेच्या स्वागत व प्रबोधन कार्यक्रमात आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी-विलास पॅलेस या फलटण येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपक राजेशिर्के बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील संभाजीराव मोहिते, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक वसंत आजमाने आणि तात्याराव मुंढे, पोपटराव पडवळ, लक्ष्मण लोहार, दिलीप भिसे, दिलीप गंगावणे, चंद्रकांत गुंजवटे, रामचंद्र खिलारे, बाळासाहेब शिंदे, शंकर पखाले, प्रल्हाद काकडे वगैरे माजी सैनिक यांच्यासह फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर महाप्रबोधन यात्रा दि.९ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातून सुरु झाली असून राज्यातील १५० तालुके आणि ३६ जिल्ह्यात २ महिने सलग प्रबोधन करुन दि.९ एप्रिल रोजी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत पुण्यात यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दिपक राजेशिर्के म्हणाले, आज लोकशाहीत आपल्याला बोलू दिले जात नाही, तर सामाजिक, घटनात्मक संस्थांचा गैरवापर करुन आपली तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, महापुरुषांचा अवमान करणे किंवा बोलू न देणे हे लोकशाहीवरील मोठे संकट आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक भाषा वापरण्याची एकप्रकारे चढाओढ सुरु झाली आहे, राज्यपालांसारखा घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती, मंत्री किंवा अन्य उच्चपदस्थ महापुरुषांबद्दल अवमान कारक वक्तव्य करतात याचा अर्थ यामागे कुठेतरी षडयंत्र असल्याचा संशय येतो.
दिपक राजेशिर्के पुढे म्हणाले, आपली लोकशाही संपवावी किंवा लोकशाहीला आणि आपल्या महापुरुषांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करीत हे षडयंत्र राज्यातील सर्वसामान्यांना समजावून देण्यासाठी राज्यातील साडे नऊ लाख माजी सैनिकांना एकत्र करुन जय जवान, जय किसान नारा देत पुन्हा एकदा सकारात्मकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिपक राजेशिर्के पुढे म्हणाले, खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद ४ वेळा भूषविले, केंद्रात कृषी व संरक्षण मंत्री म्हणून काम केले त्यावेळी सातत्याने या देशातील आणि राज्यातील शेतकरी व सैनिकांचे प्रश्नांना प्राधान्य देवून ते सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, ज्या देशात शेतकरी व सैनिक समाधानी, चिंतामुक्त असतो त्या देशात सर्वसामान्य माणूस ही सुखी समाधानी असतो. आज शेतकरी, सैनिक यांना दुर्लक्षित करण्यात येत आहे, त्यांची कुचंबणा केली जात आहे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याचा देखावा केला जात आहे. त्याच बरोबर महापुरुषांना बदनाम करुन, लोकशाही अडचणीत आणून सुरु असलेली दिशाभूल दूर करण्यासाठी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न सुरु आहे.
दिपक राजेशिर्के पुढे म्हणाले, जय जवान, जय किसान चा नारा बुलंद करण्याची आवश्यकता आहे. समाजहित जपणारी, समाजासाठी काम करणारी मंडळी घटनात्मक तरतुदींमधून उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून जेरबंद केली जातात आणि त्यांना डांबून ठेवून, बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आणि पुन्हा तपास यंत्रणांना त्यांच्या विरोधात काहीच पुरावा सापडला नसल्याचे सांगण्यात येते हे दुर्दैवी असून त्याला छेद देण्यासाठी पुन्हा महापुरुषांचे आदर्श, त्यांच्या विचारांचा जागर आणि त्यातून योग्य समाज प्रबोधन हा या महाप्रबोधन यात्रेचा उद्देश आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील संभाजीराव मोहिते यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्य कारभाराची अनेक उदाहरणे देत ते लोकहितकारी राजे होते. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी, त्यांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय दिक्षीत यांनी सर्वांचा परिचय करुन दिल्यानंतर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने फलटण तालुक्यातील मा.सैनिकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेट वस्तू देवून उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम नलवडे, फलटण शहर कार्याध्यक्ष अमोल भोईटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत निंबाळकर, नितीन मदने, श्रीधर कदम, राहुलभैय्या निंबाळकर, सोनवडी सरपंच सचिन सुर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.