**
फलटण इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न
फलटण टुडे (फलटण ) :
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण व लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर मौजे जिंती, भिलकटी व ठाकुरकी या गावांमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जिंती येथील ३८, भिलकटी येथील २६ व ठाकुरकी येथील २५ अशा एकूण ८९ महिलांचे रक्तातील हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. उपस्थित महिलांना आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मौजे जिंती येथे सकाळी दहा वाजता राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन जिंती गावच्या सरपंच पल्लवीताई लोखंडे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यावेळी जिंती ग्रामपंचायतीच्या वतीने लायन्स क्लबच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला निंबाळकर, अध्यक्षा सुनंदा भोसले, तसेच इंजिनिअरिंग कॉलेज फलटणच्या उपस्थित प्रा. धनश्री भोईटे व इतर प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.
दुपारी १२.३० मि. वाजता मौजे भिलकटी येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिलकटी गावच्या सरपंच सौ. सविता पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन शिबिर उत्साहात संपन्न झाले.
दुपारी ३.०० वाजता मौजे ठाकुरकी या ठिकाणी ठाकुरकी गावचे सरपंच रामदास शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले व उत्तम प्रतिसादात प्राथमिक शाळेत शिबिर संपन्न झाले.
या शिबिराचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ. नरेंद्र नार्वे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, सचिव, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या सुचनेनुसार करण्यात आले होते.