**
फलटण टुडे (फलटण) :
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या संचालक श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर प्रमुख वक्त्या म्हणुन उपस्थित होत्या. संपूर्ण देशात २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी “रामन इफेक्ट” हा वैशिष्टयपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. संपुर्ण देशात विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांच्या माध्यमातून संशोधक घडवण्याची जबाबदारी प्राध्यापकांवरती आहे. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी विज्ञान व संशोधन महत्त्वाचे असुन त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी ‘सायलो वर्किंग कल्चर’ ही अशी पद्धत आहे, ज्यामध्ये बहुतेक काम बंद प्रयोगशाळेत आणि गुप्ततेमध्ये चालते. ही पद्धत आता जुनी आणि जीर्ण झाली असून, शास्त्रज्ञांनी आता एकत्रित येऊन संशोधन करायची गरज आहे कारण, हे इंटरनेट आणि ‘नेटवर्किंग’चे युग आहे. त्यामुळे अलिप्त राहण्यापेक्षा संवादात आणि संपर्कात राहून जास्त प्रगती शक्य आहे. “ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीईंग’ची थीम घेऊन एकत्रित संशोधनाला वाव असल्याचे सांगितले. प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले. प्रा. शांताराम काळेल यांनी प्रास्ताविक केले.