फलटण टुडे : –
परम पूज्य गगनगिरी महाराज यांचे शिष्य श्री श्री १००८ प. पू. महामंडलेश्वर स्वामी वैराटवासी आबानंदगिरीजी महाराज , श्री पंच दशनाम जुना आखाडा यांस दिनांक ०३/०३/२०२३ रोजी सायंकाळी ०७.२५ वाजता गुरुआज्ञा झाली.
स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शिकवणीला अंगीकारून, संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा वसा घेत रंजले गांजलेल्या वृद्धांसाठी तळोजा मुंबई येथे भव्यदिव्य असा परमशांतीधाम वृद्धाश्रम उभारला. “थकल्या जीवा छाया द्या, या वृध्दाना माया द्या, निराधार त्या आधार द्या, ईश भक्तीचा आनंद घ्या” हे ब्रीद घेवून त्यांनी हजारो थकलेल्या जीवांना मायेचा आधार देत त्यांना इहीलोकी जाई पर्यंत त्यांचा सांभाळ केला. सातारा कापसेवाडी येथे अनेक गोरगरिबांची, अनाथ असलेली मुलं साक्षात दत्तक घेवून त्यांना पहिली पासून ते अगदी दहावीपर्यंत मोफत शिक्षण व राहण्याची सोय म्हणून महायोगी गगनगिरी वसतिगृह निर्माण केले. या मानवतेच्या कार्यास गेली अनेक वर्ष न चुकता स्वतःच्या देखरेखीत पार पाडले. अनेकांचे संसार थाटून दिले. निराश झालेला दुःखी, कष्टी एखादा महाराजांच्या समोर कधी गेला आणि तो चिंता मुक्त झाला नाही असा एक ही नाही. मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे ते मानीत.
“निसर्ग जगला तर मानव जगेल” या हेतूने नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जवळपास एक कोटीचे वृक्षारोपण केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हे न भुतो न भविष्यती महतकार्य मोठ्या उत्साहात पार पाडले. सर्पाने दंश केला तरी त्यावर दया भाव दाखवणारे असे ते होते. समाजात नुसते भगवाधारी महाराज खूप असतात पण समाजाप्रती प्रेम, आपुलकी व संवेदनशील असणारे आध्यात्मिक गुरु, अनाथांचा नाथ स्वामी आबानंदगिरी महाराज यांनी गेली अठ्ठेचाळीस वर्षे रात्रंदिवस लोक-कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. त्यांचे अध्यात्माचे व शास्त्राचे सखोल ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, संशोधनात्मक वृत्ती, वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त ओव्या असणारा “अमृतधारा ” हा ग्रंथ लिहिला. राजीव गांधी ग्लोबल एक्सेलान्स अवॉर्ड, सातारा अचीवर्स 2019 असे अनेक पुरस्कार मिळाले मात्र ते प्रसिध्दी पासून कायम दूर राहिले. त्यांचे मूळ गाव फलटण तालुक्यातील वाजेगांव हे होते.
ते एक राष्ट्र संत होते. आखाडा परंपरेनुसार महाराजांचा समाधी विधी रविवार दि. ०५/०३/२०२३ रोजी शिवदत्त मठ, कापसेवाडी, पोष्ट – सरताळे, तालुका – जावली, जिल्हा – सातारा येथे आंतरराष्ट्रीय आखाडा परिषदेचे महामंत्री स्वामी हरिगिरीजी महाराज तसेच देशाच्या विविध ठिकाणाहून आलेल्या संत महात्म्यांच्या व हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.