फलटण टुडे वृत्तसंस्था :
तृणधान्यांचा आहारातील समावेश सकस व पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बदलत्या जीवनशैलीचा विचार करता ग्लुटेन मुक्त आहाराचे महत्व वाढत आहे. ग्लुटेन मुक्त अन्नधान्य म्हणून तृणधान्यांचे महत्व अधोरिखीत होते. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोद्रा आणि सावा इत्यादी तृणधान्य पिके घेतली जातात. तृणधान्यांचा आहारात वापर वाढविणे व त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने अन्न व पोषण अभियानामध्ये तृणधान्यांचा समावेश पिक प्रात्यक्षिके, सुधारित वाणांचे वितरण, सुधारित बियाणे उत्पादन, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
तृणधान्यांचे आहारातील महत्व व फायदे पुढीलप्रमाणे आहेत. ज्वारी : जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात ज्वारीचे सेवन केले जाते. ज्वारी हा ग्लुटेन मुक्त तृणधान्य म्हणून ओळखले जाते. यामध्ये लोहासोबतच कार्बोदकांचे प्रमाणही चांगले आहे. तसेच फायबर, जीवनसत्वे, सुक्ष्म पोषक घटकांनी युक्त आहे. ज्वारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, रक्ताभिसरण वाढविते, वजन कमी करण्यास मदत करते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. हाडांच्या आरोग्यासाठीही ज्वारी चांगली असून ज्वारीच्या सेवनामुळे ह्दयाचे आरोग्य सुधारते. स्थूलता व सांधेवात यावर परिणामकारक असून गरोदर महिलांसाठी आवश्यक खनिजे व जीवनसत्वे यांची उपलब्धता चांगली आहे. ज्वारीतील पोषणमूल्य पुढीलप्रमाणे आहेत. तंतुमय पदार्थाने संपृक्त थायमिन, रायबोफ्लेवीन, फोलिक ॲसिड, कॅल्शियम , लोह, झिंक, सोडियम, फोस्फोरस यांनी समृद्ध आहे.
बाजारी : बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असून सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असल्याने लहान मुले व गर्भवती मातांसाठी बाजारी अतिशय उपयोगी आहे. तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त व वजन कमी करण्यास उपयोगी. ग्लुटेन फ्री असल्याने पचनास सोपे, हद्य सक्षम करते, मधुमेह व कॅन्सर रोधक, बाजरीमध्ये लेहाच प्रमाण जास्त असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते, रक्तदाब करिता उपयुक्त हिमोग्लोबिन वाढण्यासाठी व ॲनेमीया आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त. बाजरीतील पोषणमूल्ये पुढीलप्रमाणे : कॅल्शियम, विटामिन अ व ब फोस्फोरस अधिक मात्रेत उपलब्ध, लोह, फोलेट व मँगेनीज यांची उपलब्धता, असंपृक्त मेद आम्ल यांनी भरपूर.
नाचणी : नाचणीमध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले असून नाचणी मधील पोटॅशियममुळे मूत्रपिंड, ह्दय व मेंदू उत्कृष्ठपणे काम करु शकतात. व्हिटॅमिन बी मेंदूच्या कार्यापासून ते निरोगी पेशी विभाजनापर्यंत उपयोगी पडते. शरीराच्या कॅल्शीयम पूर्ततेकरिता नाचणी हा रामबाण उपाय आहे. थकवा कमी करण्यास मदत करतात. फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते, त्वचा, रक्त आणि अवयवांचे आरोग्य राखण्यासाठी नाचणीमधील नियासिन महत्वाचे आहे. तंतुमय पदार्थांमुळे आतड्याच्या कर्करोगावर उपयोगी, बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर, प्रथिनांमुळे कुपोषणावर उपयुक्त, मधुमेह रुग्णाकरिता लाभदायक. नाचणीतील पोषणमूल्ये पुढील प्रमाणे लोह, झिंक, सोडियम, फोस्फोरस व बिटा कॅरोटीन यांनी समृद्ध, प्रथिने, व्हिटामिन अ तंतुमय पदार्थांनी युक्त, ॲमिनो ॲसिड मुबलक प्रमाणात, कॅल्शियमची उपलब्धता अधिक प्रमाणात.
वरई : रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांसाठी उपयुक्त, उच्च रक्तदाब व वाढलेली कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवते, ग्लुकोज पातळी नियंत्रित करते, लेसिथिनचे प्रमाण जास्त असल्याने संवेदना प्रणालीला मजबुत करण्यासाठी उपयोगी. आहारातील महत्व पुढीलप्रमाणे : ह्दय विकाराकरिता उपयुक्त, रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते, स्तनांचे कर्करोगावर गुणकारी, ग्लुटेन मुक्त असल्याने सेलिक आजारावर गुणकारी. पोषणमुल्ये पुढीलप्रमाणे : कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, लोह, मँगनीज या खनिजांनी समृद्ध, ग्लुटेन मुक्त, जीवनसत्वांचे उत्तम स्त्रोत (फोलिक ॲसिड व बी कॉम्प्लेक्स)
राळा : व्हिटॅमिन बी -12 ने समृद्ध असल्याने हृदय व मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यास उपयुक्त, त्वचा व केसांच्या वाढीसाठी उपायुक्त, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन, कोलेस्ट्रॉल आणि फास्टिंग ग्लुकोज नियंत्रणास उपायुक्त. आहारातील महत्व पुढीलप्रमाणे : रक्तातील साखर व मेद नियंत्रित करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पचन संस्थेच्या विकारावर परिणामकारक, नॉन ॲलर्जीक व पचनास हलके. पोषणमुल्ये पुढीलप्रमाणे : तंतुमय पदार्थांची मात्रा अधिक कॅल्शियम, खजिन व तांबे मुलद्रव्याने भरपूर, प्रथिनांचा उत्तम स्त्रोत.
राजगिरा : पोटॅशियम व फायबरने समृद्ध असल्याने ह्दयासाठी निरोगी मानले जाते. आहारातील महत्व : पचन संस्था सुदृढ बनवते. त्वचा व केसांच्या आरोग्यास उपयुक्त, स्नायूंच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त. पोषणमूल्ये : प्राथिनांचा चांगला स्त्रोत, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक मुलद्रव्याने भरपूर.
हेमंतकुमार चव्हाण
माहिती अधिकारी