फलटण टुडे (फलटण) : –
पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख, व बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. सन 2010 मध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाणेची निमिर्ती झालेली आहे. मागील 12 वर्षामध्ये मोक्का कायद्यांतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस 1 ही कारवाई झालेली नव्हती.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचा पदभार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स्वीकारल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये राजकीय झुल पांघरुन तालुक्यातील गोरगरीब जनतेला फसवुन त्यांची लुबाडणुक करणा-या दिगंबर रोहिदास आगवणे व त्यांच्या इतर 6 साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर काही दिवसातच साखरवाडी भागामध्ये व्यावसायिकांना लक्ष करुन दहशत पसरविणा-या सुरज वसंत बोडरे व त्याच्या इतर 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 841/2022, भा. दं. सं. कलम 386, 395, 397, 307, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज वसंत बोडरे व त्याच्या 12 साथीदारांनी खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, जबर दुखापत घडवणु आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, जबर दुखापत व गर्दी मारामारी अशा प्रकारचे गुन्हे करुन फलटण तालुक्यातील साखरवाडी भागामध्ये दहशत निर्माण केली होती. टोळी प्रमुख सुरज वसंत बोडरे याने स्वत:चे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता प्रामुख्याने व्यावसायिकांना लक्ष केले होते.
त्यासाठी फलटण तालुक्यात दहशत पसरविण्यासाठी त्याने इतर टोळी सदस्यांना एकत्र करुन वरील प्रमाणे गुन्हे करुन दहशत निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी नमुद टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करुन आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईकरीता मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता.
नमुद प्रस्तावास मा. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण उपविभाग हे करीत आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी यापुर्वी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सन 2023 मध्ये फलटण तालुक्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत प्रस्ताव पाठविले होते. त्यास मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर यांचेकडुन मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही गुन्हेगारी टोळ्यांमधील 19 गुन्हेगार जेरबंद झाले आहेत. यामुळे फलटण तालुक्यातील जनतेमधुन समाधान व्यक्त होत आहे.