फलटण टुडे (पुणे, ) दि.8 :
पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बिंदूनामावली तपासणीचे कार्य जोरदारपणे सुरु असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनात मागासवर्ग कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 या दोन महिन्यांत विभागातील 305 कार्यालयांच्या बिंदूनामावली प्रमाणित करुन दिली असल्याची माहिती मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्त मंजिरी मनोलकर यांनी दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या 25 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 या दोन महिन्यात गट-क व गट-ड संवर्गातील बिंदूनामावली नोंदवही प्रमाणित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत विभागातील पुणे-136, सातारा-38, सोलापूर-37, कोल्हापूर-52 व सांगली-42 अशा एकूण 305 शासकीय, निमशासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांची लिपीक-टंकलेखक तसेच गट-क व गट-ड संवर्गातील पदांच्या बिंदूनामावली नोंदवह्या प्रमाणित करुन देण्यात आल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथील मागासवर्ग कक्षामार्फत पुणे विभागातील सुमारे 23 हजार कार्यालयांची बिंदूनामावली तपासण्याचे काम केले जाते. त्यामध्ये राज्यस्तरीय शासकीय, निमशासकीय कार्यालये, प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये अशा अनुदानित-विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांचे वर्ग 1 ते 4 चे अधिकारी, कर्मचारी तसेच राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था, इतर सर्व सहकारी संस्था, सहकारी बँक, मुक्त विद्यापीठ, महामंडळे आदींचा समावेश आहे. शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात रिक्त पदे भरण्याची कार्यवाही गतिमान करण्यासाठी बिंदूनामावली तात्काळ प्रमाणित करुन देण्याची कार्यवाही मागासवर्ग कक्षाद्वारे सुरु आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.