जल जीवन मिशन अंतर्गतची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

फलटण टुडे(सातारा )दि. 8 : 
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील 794 कामे नव्याने सुरु होणार आहेत. सुरु होणाऱ्या कामांवर गावच्या सरपंचांनी लक्ष देवून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत व राज्यात सातारा जिल्ह्याचा आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

 

 जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, सातारा, जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन व विविध पाणी पुरवठा योजनांचा ई-भूमिपुजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील, कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देणे हे जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, विविध पाणी पुरवठ्याची एकूण 794 कामे आहेत याची अंदाजित रक्कम 1177.09 कोटी इतकी आहे. या कामांवर सरपंचांनी स्वत: लक्ष देवून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. या कामांचे त्रयस्त यंत्रणाकडून तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील मोठ्या योजनांना मी स्वत: भेटी देवून कामांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी 2 हजार 226 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला उपअभियंताही देण्यात आलेला आहे. तसेच 227 अनुकंपाधारक असलेल्या उमेदवारांना कामावर रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

छोट्या छोट्या वस्ती, वाड्यांसाठी म्हणजे जेथे पाणी पुरवठ्याच्या योजना घेता येत नाही अशा ठिकाणी स्व. मिनाताई ठाकरे योजनेतून पाण्याच्या साठवण टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत. जल जीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या योजनेतून महिलांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पिण्याचे पाणी ग्रामस्थांना सहज उपलब्ध व्हावे हे मोठे पुण्याचे काम आहे. हे काम जल जीवन मिशन अंतर्गत सरपंचांनी करावे, असे आवाहनही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी केले.

 

जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच जिल्ह्याच्या हिताचे अनेक निर्णयही घेण्यात आले आहे. प्रशासनही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत सक्षमपणे पोहचवित आहे, असे आमदार महेश शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाणे पाणी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के हिंस्सा असून 10 टक्के निधी लोकसभागातून उपलब्ध करणे असे योजनेचे स्वरुप आहे. या अंतर्गत बहुतांश योजना सौर ऊर्जेवर घेण्यात येणार आहे. स्व. मिनाताई ठाकरे योजनेतून 45 पाणी साठवण टाक्या बसविण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी प्रास्ताविकात जल जीवनमिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या व सुरु करावयाच्या कामांची माहिती दिली. तसेच शुभारंभ होणाऱ्या पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याची ग्वाहीही यावेळी दिली.

 

      या कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!