फलटण टुडे (सातारा दि. 7 ):
“जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान” अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंदाजे 6 लाख 48 हजार बालके व किशोरवयिन मुले-मुली यांच्या आरोग्याची तपासणी करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ आठवडे चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी पासून होणार आहे.
या अभियानाच्या नियोजनाविषयी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. वैशाली बडदे आदी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी शाळा, आश्रम शाळा, अंध शाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खाजगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतीगृहे आणि शाळा बाह्य मुले-मुली याठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी प्राथमिक तपासणीसाठी 441 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
प्राथमिक तपासणीमध्ये उपचारांची आवश्यकता असल्यास अशा बालकांना औषधोपचार देऊन उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे आणि सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशनही करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बालके व किशोरवयीन मुले-मुलींनाही विशेष तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे.