फलटण टुडे(सातारा ) दि 2:
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 33 आहे. या बालकांच्या शिक्षणासाठी शिक्षण साहित्याबरोबर सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी केल्या. तसेच 13 बालकांची शैक्षणिक फी, शालेय साहित्य, वतिगृह शुल्कासाठी 1 लाख 12 हजार 472 रक्कमेला मंजूरीही देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हास्तरीय कृतीदल समितीची (टास्क फोर्स) आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) दीपक ढेपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी इतर मुलभूत गरजांसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे सांगून श्री. आवटे म्हणाले, महिला व बाल विकास विभागाच्या राज्य बाल निधीमधून सातारा जिलह्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी खर्च करण्यात यावा.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पालकत्वाचे आदेश मिळण्याबाबतची कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करावी. ज्या महिलेचे कोविडमुळे पतिचे निधन झाले आहे, अशा महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल देण्याबाबत स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. आवटे यांनी बैठकीत सांगितले.
शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य या योजनेची अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर गठीत केलेल्या समन्वय समितीने केलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचनाही केल्या.