फलटण टुडे(इंदूर, ) :
महाराष्ट्राचे पदकांचे आव्हान कायम राखताना तनिषा कोटेचा हिने मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेबल टेनिस मध्ये आणखी एक पदक निश्चित केले.
तनिषा हिने उपांत्य फेरीतील रंगतदार लढतीत हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती हिचा ४-३ अशा गेम्स मध्ये पराभव केला. शेवटपर्यंत चुरशीने झालेला हा सामना तिने १२-१०,६-११,५-११,१२-१०, ११-१३, ११-८,११-९ असा जिंकला. तिने टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. चक्रवर्ती हिने उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर हिचे आव्हान संपुष्टात आणले. उत्कंठा पूर्ण लढतीत पृथा हिला हा सामना ११-८,८-११,११-८,७-११,११-९,७-११,८-११ असा गमवावा लागला. एकेरीच्या अंतिम फेरीत तनिषा हिला दिल्लीच्या लक्षिता नारंग हिच्याशी खेळावे लागणार आहे. तनिषा हिने याआधी या स्पर्धेतील दुहेरीत रिशा मीरचंदानी हिच्या साथीत रौप्य पदक पटकाविले आहे.
मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मोदी याला उत्तर प्रदेशा दिव्यांश श्रीवास्तव याने १२-१०,११-२,११-५, ११-२ असे पराभूत केले. मात्र मोदी याला कांस्यपदकासाठी खेळण्याची अजूनही संधी आहे.
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच
महाराष्ट्राच्या सारा राऊळ व रिया केळकर तसेच मुलांमध्ये आर्यन दवंडे व मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
मुलांच्या गटात आर्यन याने प्राथमिक फेरीत पहिले स्थान घेताना ६९.७० गुणांची कमाई केली. प्राथमिक फेरीअखेर मानस हा चौथ्या स्थानावर असून त्याचे ६६.६० गुण झाले आहेत. मुलींमध्ये सारा हिने ४०.४० गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रिया हिने ४०.२० गुण घेतले आहेत.