बारामतीत सूर्यनमस्कार साधना शिबिर

फलटण टुडे (बारामती ) : 
बारामतीतील योग महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल व सूर्यनगरीतील प्राणयोगा वर्ग येथे रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने सूर्यनमस्कार साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, तसेच विद्यार्थी, खेळाडू, व्यावसायिक यांनी सूर्यनमस्कार साधनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. शास्त्रोक्त सूर्यनमस्कारासोबत योगाचार्य डॉ. नीलेश महाजन यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या फुफ्फुस व हृदयाची कार्यक्षमता वाढण्यासाठी सूर्यनमस्काराचे विविध प्रकार आवश्यक आहेत. व्यायाम आणि साधना या दोन्ही गोष्टींचा उत्कृष्ट संगम सूर्यनमस्कारामुळे घडून येतो, नियमित साधनेने शरीर बलवान होतेच, शरीरातील सर्वच स्नायूंना सांध्यांना ताण पडतो, त्यामुळे अशा पद्धतीने सर्वांनी सूर्यनमस्कार साधना करावी, असे आवाहन हनुमंत पाटील यांनी केले. सूर्यनगरी येथेही अशाच प्रकारे सूर्यनमस्कार साधना शिबिर आयोजित केले होते. सूर्याची पूजा करणे हा आपल्या परंपरेचा एक भाग • आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी सूर्यनमस्कार महत्त्वाचे आहेत, असे डॉ. महाजन यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग महाविद्यालयाचे अश्विनी वायसे, नितू साळुंखे, सोनाली ठवरे, नंदिनी खोमणे, स्वाती जाधव, नीलिमा झारगड, डॉ. मृण्मयी भेडसगावकर, संजय उंडे, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!