महाराष्ट्र मिलेट मिशनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘मिलेट मिशन’ महत्वाचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फलटण टुडे(मुंबई, ) दि. 31 : 
राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांची विक्री यांची मूल्यसाखळी विकसित होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आज महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री भरत गोगावले, आशिष जयस्वाल, प्रकाश सुर्वे, अण्णा बनसोडे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तृणधान्य पूजन आणि तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कृषी प्रधान म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पीके घेतली जात होती, आजही ती घेण्यात येतात. या पिकांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्ट‍िक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे कऱण्याचा निर्णय घेतला आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

पिकांमध्ये विविधता आणण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या पिकांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे हे मोठे वरदान ठरणार आहे. एकप्रकारे हा शेतकऱ्यांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे नवी पिढी जंकफूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थांकडे निश्चितपणे वळेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल. शासनस्तरावरुन या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. ज्वारीसाठी 73 टक्के, बाजरी साठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88 टक्के इतकी ही वाढ असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  

याशिवाय स्मार्ट या प्रकल्पांतर्गत सोलापूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट, हैदराबादच्या सहकार्याने “सेंटर ऑफ एक्सलन्स”ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. धानासाठी हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस, हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय फळपिकांसाठी चार सिट्रीस इस्टेटपैकी एक पैठण येथे स्थापन करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० आपण राबवित असून इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, या वर्षात व्यापक अशी योजना यासाठी बनवली आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भरड धान्याला विविध पदार्थात वापर करून याचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी मूल्यसाखळी विकसित करण्यात येईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक कृषी सचिव श्री. डवले यांनी केले. यावेळी त्यांनी तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स याठिकाणी लावल्याचे सांगितले.आभार कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी मानले.

शेतकरी मासिक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि पोस्टरचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शेतकरी मासिक पौष्टीक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पोस्टरचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र मिलेट मिशन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. शेतकरी मासिकात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष -2023 च्या अनुषंगाने राज्यात पिकविण्यात येणाऱ्या मुख्य व लघु पौष्ट‍िक तृणधान्य पिकाच्या लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया, आहारातील महत्व व त्यांचा लोकांच्या आहारात वापर वाढ करण्याच्या अनुषंगाने माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबवावयाच्या विविध योजनांची माहिती पोस्टरमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरापासून ते ग्रामपातळीपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार

यावेळी शेतीमध्ये पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सोनू बांगारा (माळ, जि. ठाणे), किसन मोढवे (मर्दी, जि. ठाणे), काकड्या लहांगे (उज्जेनी, जि. पालघर), आनंता धिंडा (सातरोंडे, जि. पालघर), जानू कामडी आणि पद्माकर वाख ((मुसई, जि. ठाणे), तानाजी यादव (गमेवाडी, जि. सातारा), होरुसिंग ठाकरे (बंधारा, जि. नंदुरबार), प्रकाश गायकवाड (पिसाळवाडी, जि. सातारा), बाजीराव चौरे (बाभूळणे, जि. नाशिक), निंगोजी कुंदेकर (शेवाळे, जि. कोल्हापूर), प्रमोद माळी (पिंपरखेड, जि.जळगाव), भामटा पाडवी ((खेडळे, जि.नंदुरबार), तात्यासाहेब फडतरे (समृद्धी ॲग्रो ग्रुप. राहाता, जि. अहमदनगर), महेश लोंढे (ॲग्रोझी ऑरगॅनिक भरडधान्य प्रक्रिया उद्योग, उरळीकांचन, जि. पुणे), शंतनू पाटील (मेलूप फू़डस, सोलापूर), श्रीमती नीलिमा जोरवार (संचालक, कळसूबाई शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक), महेंद्र छोरिया (यश इंटरप्रायजेस, नाशिक), प्रसाद औसरकर (शहापूर, जि. ठाणे) आणि बारवी ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी (पाटगाव, जि. ठाणे) यांचा समावेश आहे.

विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी

आजच्या या कार्यक्रमावेळी प्रांगणात ज्वारी, बाजरी, नाचणी यासह विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मंत्रालयातील अधिकारी – कर्मचारी आणि मंत्रालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी या पदार्थांची खरेदी केली. 
समृद्धी ॲग्रो, पुणे, कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक. एमटीडीसी आणि दादर केटरिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले आदर्श प्रभाग संघ, नाचणगाव, वर्धा. आदर्श स्वयंसहायता महिला समूह, ताम्हाणे, रत्नागिरी. एव्हीपी फूडस स्टफ, शहापूर. सान्वी कुकीज, ऐरोली. बारवी ॲग्रो, मुरबाड. अग्रणी शेतकरी उत्पादक गट, कवठेमहांकाळ.
पवित्र अन्न प्रक्रिया गृहउद्योग, भिवंडी. जय भवानी महिला बचत गट, जव्हार. कृषी विभाग ठाणे अधिकारी- कर्मचारी महिला, कृषी विभाग भिवंडी, श्री गणेश महिला बचत गट, कर्जत. श्रीयाज फूडस पनवेल. हिरकणी प्रभाग संघ, आदर्श महिला प्रभाग संघ, पालघर. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र, शहापूर. सुसी फूडस् रायगड. स्वयंसिद्धा महिला स्वयंसहायता समूह पनवेल. प्रेरणा स्वयंसहायता महिला समूह, खालापूर. रत्नाई महिला समूह, खालापूर, श्री वैभव इंडस्ट्रीज, जळगाव, ओम नमोशिवाय महिला समूह, साक्री, धुळे, मिलूप फूडस, बार्शी. यशस्व‍िनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, बोरामणी, दक्षिण सोलापूर. शिवमुद्रा शेतकरी गट, मांडेदुर्ग, चंदगड, धनदाई महिला बचत गट, रोहा, रायगड आणि अरूणिका फूडस, धुळे यांचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले होते. 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!