फलटण टुडे (फलटण), दि.31 :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की, दि.17 व 18 जानेवारी 2023 रोजी इंदूर येथे ‘प्रांतीय मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी म.सा.प.चे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांची निवड झाली होती. त्यावेळी मध्यप्रदेश सरकारने प्रा.जोशी यांना जाण्या-येण्याच्या प्रवासासह इंदूर येथील वास्तव्यात ‘विशेष राज्य अतिथी’ दर्जा दिला होता. शिवाय राजशिष्टाचार म्हणून एक्सॉर्टसह वाहन, संरक्षण, निवास आदी व्यवस्था देण्यात आल्या होत्या.
मध्यप्रदेश सरकारने मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल जशी उदार भूमिका दाखवली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी राज्य अतिथी दर्जाचा राजशिष्टाचार द्यावा. दि.3 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करुन त्याचदिवसापासून संमेलन अध्यक्षांना असा विशेष दर्जा देण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सदर मागणीबाबतचा ठराव नुकत्याच पुणे येथे झालेल्या म.सा.प. कार्यकारी मंडळ सभेत आपण मांडला असून तो सर्वानुमते मंजूर झाल्याची माहितीही बेडकिहाळ यांनी दिली.